मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारार्थ सभांचा धडाका लावला आहे. या सभांच्या माध्यमातून ते मनसेच्या (MNS) उेमदवाराला विजयी करण्याचं आवाहन जनतेला करत आहेत. आता, निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवासांत मोठ्या-मोठ्या सभा होणार आहेत. त्यात, मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरही सभा होणार आहे. मात्र, राज ठाकरेंनी (Raj Thackeray) तब्येत ठीक नसल्याने मनसेच्या पुढील सभा होतील की नाही, हे अद्याप तरी निश्चित नाही. भिवंडी येथे मनसेच्या उमेदवारांसाठी आज राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी सभेसाठी व्यासपीठावर जाण्याचे टाळत थेट ज्या ठिकाणी जाहीर सभेसाठी आलेले मनसैनिक बसलेले त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. माझी प्रकृती ठीक नसल्याने मी पुढे सुद्धा अशाच पद्धतीने फक्त भेटी घेण्यासाठी जाणार आहे, कुठे पुढच्या जाहीर सभेमध्ये मी भाषण करणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
मी तुमचं दर्शन घेण्यासाठी इथे आलो, माझी थोडीशी तब्येत ठीक नाही. त्यामुळे, मी भाषण न करता आपली भेट घेऊन जाईल, माझे सहकारी तुम्हाला ते सांगतील. पण, येत्या 20 तारखेला कुणीही गाफील राहू नका, आपले मित्र-परिवार आणि नातेवाईक यांना सांगून आपल्या मनसेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केलं. तसेच, वणवण फिरणं, बडबड करणं हे काहीवेळाला अंगलट येतं. पण, आपण सर्वजण समजून घ्याल अशी अपेक्षा, पण या उमेदवारांच्या विजयानंतर मी लवकरच आपल्या भेटीला येईल, असे म्हणत राज ठाकरेंनी सभास्थळावरुन काढता पाय घेतला. त्यामुळे, येथील उमेदवार व सभेसाठी गर्दी केलेल्या मनसैनिकांची काहीशी निराशा झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे, राज ठाकरे यांच्या यापुढील सभा होणार की नाही, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
दरम्यान, आजच राज ठाकरे यांनी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
जाहिरनाम्यात पहिल्या भागात, मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टी आहेत. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. दुसऱ्या विभागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिसरा विभाग, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार