भोर: भोर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. भोर मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बारामती लोकसभेचा भाग आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व आहे. अनंतराव थोपटे आणि कुटुंबीयांनी भोर मतदारसंघामध्ये अनेक दशके काँग्रेस पक्षाचं नेतृत्व अबाधित ठेवलं आहे. पण या विधानसभा निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणावर राजकीय समीकरणं बदलल्याचं दिसून येत आहे. या निवडणुकीवेळी काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात हा सामना होणार आहे.(Bhor Assembly constituency)
1980 व 1999 वगळता 45 वर्षांपासून या मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व असल्याचं चित्र आहे. 2009 सालापासून सलग तीन निवडणुका आमदार संग्राम थोपटे यांनी जिंकून या मतदारसंघात हॅट्ट्रिक केली आहे; मात्र असं असलं तरी दरवेळी मताधिक्य कमी होत गेल्याचं दिसून आलं त्यामुळे आता या विधानसभा निवडणुकीमध्ये संग्राम थोपटे विजयाचा चौकार मारणार की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना रोखणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Bhor Assembly constituency)
हा मतदारसंघ मुळशी तालुका, वेल्हे तालुका, भोर तालुका अंतर्गत येतो. अनंतराव थोपटे या मतदारसंघातून सहा वेळा विजयी झाले आहेत. तर त्यांचे पुत्र संग्राम थोपटे हे तीन वेळा या जागेवर विजयी झाले आहेत. दोघेही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत.या मतदारसंघात 1962 मध्ये पहिल्यांदा निवडणूक झाली होती. त्यानंतर या जागेवर शंकर भेलके यांनी बाजी मारली होती. या जागेवर भारतीय काँग्रेसचे वर्चस्व आहे. 2004 ते 2019 पर्यंत काँग्रेस पक्षाकडून ही जागा कोणीही जिंकून घेऊ शकलेलं नाही.
या मतदारसंघात थोपटे कुटुंबाचे वर्चस्व आहे. ही जागा पिता-पुत्राने 9 वेळा जिंकली आहे. 2004 पासून भोर विधानसभा मतदारसंघावर या घराण्याचे वर्चस्व आहे. आता काँग्रेसला आपल्या बालेकिल्ल्यात विजय मिळविता येतो की महायुती संग्राम थोपटेंना विजयाचा चौकार मारण्यापासून थांबवते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काँग्रेसकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर महायुतीतून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाला मिळाली असून शंकर मांडेकर हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत.
2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे संग्राम अनंतराव थोपटे 1,08,925 मते मिळवून विजयी झाले होते. शिवसेना पक्षाचे कुलदिप सुदाम कोंडे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. संग्राम अनंतराव थोपटे यांचा 9,206 मतांनी विजय झाला होता.