आयपीएल मेगा लिलावासाठी जगभरातील 1574 खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी 1000 नावं बाद झाली आहेत आणि 574 खेळाडूंसाठी बोली लागणार आहे. यापैकी 204 खेळाडूंना फ्रेंचायझींकडून खेळण्याची संधी मिळणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी 574 खेळाडूंची नावं लिलावात असल्याचं जाहीर केलं आहे. या खेळाडूंचा फैसला सौदी अरेबियातील जेद्दाह येथे 24 आणि 25 नोव्हेंबरला होणार आहे. 574 खेळाडूंपैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी आहेत. यात 48 कॅप्ड भारतीय खेळाडू आहेत. तसेच 318 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. मेगा लिलावासाठी 193 विदेशी कॅप्ड खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. तर 12 अनकॅप्ड खेळाडूही लिलावात असल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच सहयोगी राष्ट्रांतील 3 खेळाडू आहेत. मेगा ऑक्शनमध्ये उतरलेल्या 81 खेळाडूंची बेस प्राईस ही 2 कोटी रुपये आहे. तर 27 खेळाडूंची बेस प्राईस ही 1.50 कोटी आहे. 18 खेळाडूंनी त्यांची बेस प्राईस ही 1.25 कोटी ठेवली आहे.
10 फ्रेंचायझींची रिटेन्शन यादी पाहता आता एकूण 204 खेळाडूंसाठी जागा रिक्त आहेत. यात 70 जागा या विदेशी खेळाडूंसाठी आहेत. 574 पैकी सर्वात जास्त लक्ष हे 12 खेळाडूंवर असणार आहे. या खेळाडूंपासून लिलावाची सुरुवात होणार आहे. मार्की प्लेयर्सची दोन वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक सेटमध्ये 6-6 खेळाडू असतील. हे खेळाडू लिलावापूर्वीच चर्चेत असतात. पहिल्या सेटमध्ये जोस बटलर, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग आणि मिचेल स्टार्क यांचा समावेश आहे. दुसऱ्या सेटमध्ये युझवेंद्र चहल, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, केएल राहुल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज असेल. म्हणजेच सुरुवातीलाच दिग्गज खेोळाडूंवर बोली लागेल.
आयपीएल मेगा लिलाव 2025 ची बोली लावण्याची जबाबदारी मल्लिका सागर हिच्याकडे दिली आहे. मिनी लिलावात तिने ही जबाबदारी चोखपणे पार पडली होती. आयपीएल मेगा लिलाव 24 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता सुरु होईल. तर खेळाडूंवर 3 वाजल्यापासून बोली लागेल.