'परवा भुजबळ म्हणाले, भाजपसोबत गेलो नसतो तर तुरुंगात जावं लागलं असतं, यापूर्वी सहा महिने जाऊन आलो, गेल्यावर काय होतं ते अनुभवलंय, आता पुन्हा नको' : शरद पवार
विजय केसरकर, एबीपी माझा November 15, 2024 11:13 PM

Sharad Pawar on Chhagan Bhujbal, कोल्हापूर : "परवा भुजबळ यांनी सांगितलं की, भाजपसोबत गेलो नसतो तर आणखी तुरुंगात जावं लागलं असतं. एकदा सहा महिने तुरुंगात जाऊन आलो, तिथं गेल्यावर काय होतंय ते अनुभवलंय. आता पुन्हा नको. आम्ही तुम्हाला हातो जोडतो आम्ही जातो तुम्ही या. मी त्यांना स्वच्छ सांगितलं की, ज्यांचे हात कुठेतरी बरबटलेले असतात, भ्रष्टाचारात सहभागी झाले असतील तरच त्यांना चिंता आहे, माझ्या सारख्याला चिंता नाही", असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केलीये. गडहिंग्लजमध्ये समरजीत घाटगेंच्या प्रचारार्थ शरद पवारांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते. 

शरद पवार म्हणाले, तुमच्या आमदारांनी हळूच कानात सांगितलं की, तुम्ही आमच्याबाबत विचार केला नाही तर आम्हाला आतमध्ये जावं लागेल. त्यानंतर काही दिवसांनी वाचायला मिळालं त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली. त्यांच्या घरातील भगिनीने सांगितलं की, ज्या पद्धतीची वागणूक तुम्ही आम्हाला देताय. ही वागणूक मिळणार असेल तर आम्हाला गोळ्या घाला.  हे सगळं घडलं. हे घडू नये, यासाठी हा उद्योग या सर्वांनी केला. यामध्ये सत्यता किती आहे, हे छगन भुजबळांनी सांगितलं. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रावर धोकेबाजी करण्याचं काम केंद्र सरकारकडून होत आहे. नरेंद्र मोदींच्या सरकारकडून होतं आहे. महाराष्ट्राला सन्मानाची वागणूक मिळत नाही. यासाठी एकसंघ होऊन महाराष्ट्राच्या पदरात न्याय मिळेल, याची खबरदारी घेण्याची गरज होती. मात्र, याला साथ देण्याऐवजी आमचे काही लोक निघून गेले. 

सोडून गेलेले लोक ऐकेदिवशी भेटायला आले होते. मला म्हणाले आम्ही सर्वजण काहीतरी वेगळा विचार करतोय. तुम्ही आमच्याबरोबर चला. मी त्यांना म्हणालो, ज्यांच्या विरोधात मतं मागितली , त्याच्यासोबत जाणं मला पटणारं नाही. ज्यांनी तुम्हाला विरोध केला, त्यांच्या दावणीला जाऊन बसायचं? हे माझ्याकडून शक्य नाही. तुम्हाला काही करायचं असेल तर करा हे योग्य नाही. या गोष्टीला आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही, असंही शरद पवार यांनी नमूद केलं. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar : लोकं निर्लज्जासारखं आम्हाला सोडून गेले, आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं, यांना पाडलं पाहिजे; शरद पवारांचा मुश्रीफांवर हल्ला

 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.