शिरोळ : हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे. तालुक्याचे अनेक मान्यवरांनी प्रतिनिधित्व केले. त्यांच्या विचारांना अनुसरून कोणावरही टीकाटिप्पणी न करता तालुक्यात झालेला शाश्वत विकास लोकांसमोर मांडत आहे. या मुद्द्यावरच मी विधानसभेच्या रिंगणात उतरलो असून, जनता मला पुन्हा संधी देईल, असा विश्वास राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला.
प्रश्न : महायुतीला साथ दिली असताना राजर्षी शाहू विकास आघाडीतून उमेदवारी का?
उत्तर : मूलभूत सुविधांसह विकासात्मक कार्य करण्यासाठी रिंगणात उतरलो आहे. याआधीही सुमारे दोन हजार कोटींची विकासकामे तालुक्यात केली आहेत. प्रामाणिकपणे विकासात्मक दृष्टिकोन बाळगून पाच वर्षांत कर्तव्य पार पाडले. बदलत्या समीकरणाच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी घेऊन मैदानात उतरलो आहे.
प्रश्न : भविष्यातील वाटचाल कशी असणार?
उत्तर : पाच वर्षांत जाहीरनाम्यात दिलेली बहुतांश कामे पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. उर्वरित कामे पाच वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प आहे. तालुक्यात मिळणारा प्रतिसाद आणि विकासात्मक दृष्टी यावर हा संकल्पही पूर्ण होईल, यात शंका नाही.
हेही वाचाप्रश्न : भविष्यात तालुक्याच्या कोणत्या महत्त्वपूर्ण योजना अमलात आणण्याचा प्रयत्न असेल?
उत्तर : टाकळी व अकिवाट येथे मंजूर असलेल्या शासकीय औद्योगिक वसाहतीत युवक उद्योग उभारू शकतील. येथे गारमेंट उद्योगातून महिलांना रोजगार मिळेल. उत्पादन, सेवा, शेतीपूरक अशा विविध उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्यामुळे परिसरासह तालुक्यातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावेल.
प्रश्न : आपण ग्रमीण भागात विकास केला. पण, शहरांसाठी काय केले?
उत्तर : जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड शहरांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला. जयसिंगपूर व शिरोळमध्ये नळ पाणीपुरवठ्याचे कामे पूर्णत्वास येत आहे. भुयारी गटारीची कामे सुरू आहेत. जयसिंगपूमध्ये नगरपालिकेची सुसज्ज इमारत व अद्ययावत बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आहे. तिन्ही शहरांतील अनेक समाजांना सांस्कृतिक सभागृहे मंजूर केली आहेत.
प्रश्न : क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी काय करीत आहात?
उत्तर : तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील २७ गावांमध्ये १३ हजार एकर क्षेत्र क्षारपड असून, त्याचा सर्व्हे झाला आहे. त्यामध्ये शासनाने सात गावांसाठी ‘क्षारपड जमीन सुधारणा योजना’ या पथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिली आहे. यात शासन ८० टक्के व शेतकरी २० टक्के रक्कम भरून हा प्रकल्प पूर्ण होईल. भविष्यात उर्वरित क्षारपड जमिनी शासनाच्या प्रकल्पांर्गत क्षारपड मुक्त करू.
प्रश्न : कोणत्या मुद्द्यांच्या आधारे दुसऱ्यांदा विधानसभेत जाऊ शकता?
उत्तर : तालुक्यातील प्रत्येक गावाला निधी दिला आहे. प्रचारात या विकास निधीबाबत चर्चा होत आहे. ३०० बेडचे प्रादेशिक मनोरुग्णालय उदगाव व दत्तवाड येथे ग्रामीण रुग्णालय, जयसिंगपूर येथे विश्रामगृह, आगर व जयसिंगपूर येथे मागासवर्गीय मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारण्यात येत आहे. ४४ गावांतील नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत.
नृसिंहवाडी, खिद्रापूरला मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. जयसिंगपूरला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा प्रगतीपथावर आहे. तालुक्याचा शाश्वत विकासाच्या आधारेच मी दुसऱ्यांदा विधानसभेत जात आहे.