बारामती, ता. १५ : ‘‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला याला सुप्रिया सुळे कारणीभूत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे, पण पवार कुटुंब व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडण्याचे पाप फडणवीस व भाजपने केले आहे. बारामतीत आज जी स्थिती निर्माण झाली, त्याला पूर्णपणे फडणवीस व भाजपच जबाबदार आहे. सुप्रिया सुळे यांना पुढे केल्याने अजित पवार बाहेर पडले, हे फडणवीस यांचे वक्तव्य बारामतीकरांसाठी सर्वाधिक हास्यास्पद आहे,’’ असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडविली.
बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांना पुढे केल्यामुळेच अजित पवार बाहेर पडले, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत बोलले होते, त्याबाबत प्रश्न विचारला असताना सुप्रिया सुळे यांनी वरील स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या, ‘‘डेटा काढून बघा मला किती पदे मिळाली व अजित पवारांना किती मिळाली. देवेंद्र फडणवीस यांनाही डेटा आवडतो. आता आमच्यावर टीका करायला मुद्देच राहिलेले नसल्याने अशी वक्तव्ये होत आहेत. परिवारवाद हा भाजपमध्ये अधिक आहे. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी आयुष्य वेचूनही त्यांच्या मुलांना भाजपने का संधी दिली नाही? संस्काराबद्दल ते सतत बोलतात, पण नाती जोडायला ते सगळ्यात मागे असतात. काम झाले की फेकून द्या, अशी त्यांची संस्कृती आहे.’’
सुप्रिया सुळे म्हणाल्या...
- देवेंद्र फडणवीस यांना सध्या शरद पवार यांच्याशिवाय काहीच दिसत नाही. त्यामुळे सातत्याने ते त्यांच्यावरच टीका करत राहतात, पण त्याने महागाई, बेरोजगारी या सारखे प्रश्न सुटणार आहेत?
- बटेंगे तो कटेंगे ही भाषा महाराष्ट्रात चालणार नाही. आम्ही सहन करणार नाही. हा देश त्यांच्या मनमानीपणे नाही तर संविधानाने चालतो.
- आजही देशात कुठेही गेला आणि बारामतीचे नाव घेतले तर फक्त शरद पवार यांचाच उल्लेख केला जातो.
अजित पवार यांना राज्याचे चार वेळा उपमुख्यमंत्रिपद दिले गेले होते, निर्णयप्रक्रियेतही तेच कायम होते, घरातील एक कर्ता पुरुष निर्णयप्रक्रिया करत असेल तर धाकट्या बहिणीला कायमच आनंदच होत असतो, तसाच मलाही होत होता. मला राज्याच्या राजकारणात फारसा रस कधीच नव्हता. मी केंद्रात आणि अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांनी राज्यात प्रक्रियेत सहभागी व्हायचे, असेच कायम होते. सुप्रिया सुळे यांना पक्ष, बारामती व एकूणच राज्याच्या निर्णयप्रक्रियेत किती स्वातंत्र्य होते, हे बारामतीकरांपेक्षा जास्त कोणालाच माहिती नाही.
- सुप्रिया सुळे, खासदार