कथालेखिकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा
esakal November 16, 2024 01:45 AM

कथालेखिकांनी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा
प्रा. अश्विनी निवर्गी; राज्यभरातील ८० लेखिका कार्यशाळेत सहभागी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : कथालेखन करताना आकर्षक, अर्थपूर्ण शीर्षक आणि परिणामकारक शेवट, शब्दसंख्या, शुद्धलेखन, शैली अशा महत्त्वाच्या अनेक बाबींवर लक्ष द्या. आजच्या काळानुरूप मोबाईल, संगणक, आदी तंत्रज्ञानाची जुजबी माहितीही आवश्यक आहे. लेखिकांनी कथालेखन करताना बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन साहित्यिक प्रा. अश्विनी निगर्वी यांनी केले.
आम्ही सिद्ध लेखिका साहित्यसंस्थेच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे राज्यभरातील लेखिकांसाठी आयोजित कथालेखन कार्यशाळेत त्या बोलत होत्या. राज्यभरातून ८० लेखिका या कार्यशाळेत सहभागी झाल्या. आम्ही सिद्ध लेखिका रत्नागिरी जिल्ह्याच्या अध्यक्षा सुनेत्रा जोशी यांच्या पुढाकाराने राज्यभरातील साहित्यिक सदस्यांसाठी कथालेखन प्रकाराचे उत्तम मार्गदर्शन व्हावे व त्यातूनच उत्तम कथालेखिका निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने याचे आयोजन केल्याचे सांगितले.
प्रा. निगर्वी यांनी कथालेखनासाठी आवश्यक अशा मांडणीच्या अनेक मुद्द्यांवर सोदाहरण विस्तृत विवेचन केले, असेही त्या म्हणाल्या. लेखनशैली, मुद्देसूद मांडणी, शुद्धलेखन, कथाबीज इत्यादींवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. लिखाणासाठी उत्तम वाचनही आवश्यक असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. ई-मेल, युनिकोड, वर्डफाईल, पीडीएफ, पेनड्राईव्ह इत्यादी आयुधांचा वापर कसा करावा, ते त्यांनी सांगितले. त्यांनी विविध विषयांवरील लिखाणाची अनेक उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. उपस्थित लेखिकांच्या प्रश्नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
केंद्रीय कार्यकारिणीच्या अध्यक्षा ठाण्याच्या पद्माताई हुशिंग यांनी रत्नागिरी शाखेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. परिचय प्रा. उमा जोशी यांनी करून दिला. केंद्रीय समितीच्या कार्याध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अनुराधा दीक्षित यांनी केले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.