वडगाव मावळ, ता. १५ ः बजरंग दलाच्यावतीने भोयेरे येथील ठाकर वाडीवर ग्रामीण दीपावली उत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमात सुमारे अडीचशे कार्यकर्ते सहभागी झाले होते. बजरंग दलाच्यावतीने संतोष भेगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चोवीस वर्षांपासून मावळ तालुक्यातील आदिवासी, कातकरी, ठाकर पाड्यांवर दिवाळीचा कार्यक्रम साजरा केला जात आहे. समाजामध्ये समानता आणि समरसता निर्माण करण्यासाठी बजरंग दल हा उपक्रम राबवत आहे.
यावर्षी जिल्हा सहमंत्री महेंद्र असवले यांच्या नेतृत्वात भोयरे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी हा सण घरापुरता मर्यादित नसून तो समाजात जाऊन समाजाची नाळ जोडून साजरा करणे हाच खरा दिवाळीचा आनंद आहे असा संदेश बजरंग दलाच्यावतीने देण्यात आला. बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक विवेक कुलकर्णी व प्रांत विश्व हिंदू परिषद मंत्री किशोर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या बांधवांना स्वयं रोजगाराची गरज आहे. याठिकाणी आपण चांगल्या प्रकारचा स्वयंरोजगार निर्माण करू आणि प्रत्येक महिन्याला एक आरोग्य शिबिर घेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक ग्रामस्थ सुनील सप्रे यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. प्रांत निधी प्रमुख धनाजी शिंदे, प्रांत बजरंग दल सहसंयोजक संदेश भेगडे, अंदर मावळ प्रखंडचे अध्यक्ष अनंता अगळमे आदी उपस्थित होते. प्रा. बाळासाहेब खांडभोर यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा सहमंत्री महेंद्र असवले यांनी आभार मानले. निखिल भांगरे, राम कल्हाटकर, गणेश दमामे, स्वप्नील भालेकर, प्रशांत भेगडे, बाळू जाधव, जालिंदर जाधव, यश भांगरे, ऋषी अगळमे, गौरव वाघमारे, ऋषी पुराणे, दादा काटकर, रवी असवले, ऋषी भोईरकर, भास्कर गोलीया, आदित्य जाधव आदींनी संयोजन केले.