कणकवलीत मतदानाची तयारी पूर्ण
३३२ मतदान केंद्रे; १ हजार ११६ जणांचे होणार गृहमतदान
सकाळ वृत्तसेवा
कणकवली,ता. १५ ः कणकवली विधानसभा मतदारसंघातील ३३२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून २ लाख ३१ हजार ७४० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन सहाय्यक अधिकारी, दोन पोलिस कर्मचारी असे १ हजार ९९२ कर्मचारी आणि राखीव कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर सर्व तयारी असून १९ नोव्हेंबरला सकाळी दहाला कर्मचारी प्रत्येक मतदान केंद्रावर रवाना केले जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. जगदीश कातकर यांनी दिली.
कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तीन तालुक्यांमध्ये ३३२ मतदान केंद्रे आहेत. या अंतर्गत सर्व तयारी झाली आहे. तत्पूर्वी ८५ वर्षांवरील ९५५ मतदारांना त्यांच्या घरोघरी जाऊन १५ ते १७ नोव्हेंबर पर्यंत मतदान केले जात आहे. यामध्ये १६१ दिव्यांग मतदार आहेत. अशा एकूण १ हजार ११६ मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान घेतले जाणार आहे. एका मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन सहाय्यक अधिकारी, दोन पोलीस कर्मचारी असतील. या विधानसभा मतदार संघामध्ये ४७ झोनल अधिकारी तर ६२ केंद्रावर सूक्ष्म निरीक्षक ठेवले आहेत. कणकवली महाविद्यालयामधून ४५ एसटी बसमधून दूरवरच्या केंद्रांवर सर्व कर्मचारी आणि साहित्य पाठवले जाईल. तसेच कणकवली शहर आणि लगतच्या केंद्रांवर २७ जीप गाड्यांमधून कर्मचाऱ्यांसह साहित्य पाठवले जाणार आहे. मतदानासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकीसाठी कणकवली महाविद्यालयाच्या पाठीमागे पार्किंग व्यवस्था केली असून चार चाकींसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर पार्किंग व्यवस्था आहे. कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथे दिव्यांग मतदान केंद्र तर कलमठ येथे महिलांचे सखी मतदान केंद्र आहे. तर देवगड तालुक्यातील जामसांडे मतदान केंद्रावर युवा मतदान केंद्र तयार केले आहे. या मतदारसंघांमध्ये २ लाख ३१ हजार ७४० मतदारांपैकी १ लाख १४ हजार ३७९ पुरुष तर १ लाख १७ हजार ३५९ महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदाराला मतदानादिनी आधारकार्ड, मतदानकार्ड, बँकेचे पासबुक, पॅनकार्ड असे शासनमान्य १२ पुरावे सोबत घेऊन मतदान करावे लागणार आहे. येथील कणकवली महाविद्यालयात २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
------------
दृष्टिक्षेपात
- एकूण मतदार - २ लाख ३१ हजार ७४०
- पुरुष मतदार - १ लाख १४ हजार ३७९
- महिला मतदार - १ लाख १७ हजार ३५९