25350
राणेंमुळे जिल्हा अविकसित
संदेश पारकर ः शिरवली येथील बैठकीत टीका
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः ‘‘केंद्रीय उद्योगमंत्रिपदापर्यंत पोचलेले नारायण राणे जिल्ह्याच्या विकासाची दिशा बदलू शकले असते. मात्र, त्यांना केवळ स्वत:चा आणि निवडक कार्यकर्त्यांचा विकास करायचा होता. त्यामुळे त्यांनी जनतेची दिशाभूल करून जिल्हा अविकसित ठेवला. राणेंचाच हा वारसा आमदार नीतेश राणे पुढे चालवत आहेत. त्यामुळे आता राणेंना घरी बसविण्याची वेळ आली आहे,’’ असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी केले.
श्री. पारकर यांनी शिरवली येथे प्रचार बैठक घेतली. यावेळी गणेश पोयरेकर, संदीप पोयरेकर, सुनील पोयरेकर, दिनेश पोयरेकर, रवींद्र पोयरेकर, जिवाजी पोयरेकर, संतोष पोयरेकर उपस्थित होते. श्री. पारकर म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक कर्तृत्ववान अधिकारी येऊन गेले. त्यांनी जिल्हा विकासाचा आराखडाही निश्चित केला होता. परंतु, राणेंनी उद्योग, रोजगार आदींसाठी आलेला सर्व निधी रस्ता डांबरीकरणाकडे वळवला. यातून राणेंना ‘टक्केवारी’ मिळत गेली, तर त्यांचे निवडक कार्यकर्ते गब्बर झाले. यात रोजगार देणाऱ्या उद्योगांची उभारणी झालीच नाही, किंबहुना सर्वसामान्य जनता गरीब राहावी, जनतेला केवळ निवडणुकीपुरतेच पैसे वाटप करून त्यांना त्या वेळेपुरते खूष ठेवावे, असाच फंडा राणेंनी आजवर राबवला. राणेंचे सुपुत्र नीतेश हे देखील तोच कित्ता गिरवत आहेत. त्यामुळे राणे असेपर्यंत जिल्ह्यात उद्योग येण्याची अजिबात शक्यता नाही. राणेंना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे.’’
श्री. पारकर यांनी शिरवलीसह नाद, उंबळ, महाळुंगे, गवाणे या गावांतही प्रचार बैठका घेतला.
ते म्हणाले, ‘‘तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय, आशीर्वाद तुम्ही मला दिलेत, म्हणूनच पारकरांसारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता या अपप्रवृत्तीच्या विधानसभेची निवडणूक लढवतोय. सर्वसामान्यांच्या पाठबळावर ही निवडणूक जिंकणार देखील आहोत. त्यासाठी प्रत्येक मतदार मशाल चिन्हावर मतदान करेल, असा विश्वास आहे.’’
सभेवेळी शिरवली येथील सविता पोयरेकर, पल्लवी पोयरेकर, उज्ज्वला कोयळे, ललिता तोरस्कर, सागर बोरुले, काशिनाथ मेस्त्री, प्रकाश गोरुले, दिलीप वाडेकर, संभव गोरुले, सुहास गुरव, प्रदीप नारकर, दीपक देवरुखकर, काशिनाथ मेस्त्री, पूजा वाडेकर यांच्यासह गावातील महिला, पुरुष उपस्थित होते.
----------------------------
25353
जामसंडेत आमदार राणेंनी
काढली पायी प्रचार फेरी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १५ ः भाजप महायुतीचे विधानसभा उमेदवार आमदार नीतेश राणे यांनी जामसंडे शहरात पायी प्रचारफेरी काढली. स्थानिक व्यावसायिकांच्या भेटी घेत मतदान आवाहन पत्रकांचे वाटप करून त्यांनी प्रचार केला. त्यांच्यासमवेत माजी आमदार अॅड. अजित गोगटे, बाळ खडपे यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्ताने जामसंडे येथे भरलेल्या यात्रेलाही त्यांनी भेट दिली.
श्री. राणे यांच्या प्रचारार्थ जामसंडे येथे भाजपतर्फे प्रचार फेरीचे आयोजन केले होते. जामसंडे येथील श्री दिर्बादेवी बस थांब्यापासून या प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. यामध्ये श्री. राणे यांच्यासह माजी आमदार अॅड. गोगटे, श्री. खडपे, तसेच नगरसेवक शरद ठुकरूल, नगरसेविका प्रणाली माने, प्रियांका साळसकर, उषःकला केळुसकर, योगेश चांदोस्कर, राजेंद्र वालकर, योगेश पाटकर, शामराव पाटील, उल्हास मणचेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. जामसंडे बाजारपेठेतून पायी प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी श्री. राणे यांनी व्यावसायिकांच्या दुकानात जाऊन प्रचार केला. रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, येथील महाविद्यालय नाका परिसरातही पायी प्रचार करण्यात आला.