25428
राणेंची भूमिका मान्य आहे?
अंधारेंचा शिंदेंना प्रश्न; शिवसेनाप्रमुखांवर टीका केल्याचा मुद्दा
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. १५ ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर धर्मवीरांच्या कथित मृत्यूप्रकरणी थेट आरोप करणाऱ्या नीलेश राणे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे त्यांची भूमिका शिंदे यांना मान्य आहे का? हे त्यांनी जाहीर करावी, असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून दिले.
येथील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत कुडाळ मतदारसंघाचे ठाकरे शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत आदी उपस्थित होते.
श्रीमती अंधारे म्हणाल्या, ‘‘धर्मवीर आनंद दिघे यांचे अनेक चित्रपट श्री. शिंदे काढत आहेत. त्याच धर्मवीरांच्या मृत्यूबाबत त्यांचे कुडाळचे उमेदवार राणे यांनी बाळासाहेबांवर थेटपणे आरोप केले होते, ते शिंदे यांना मान्य आहेत का? त्यांनी केलेली चिखलफेक त्यांना मान्य आहे का? खासदार नारायण राणे यांनी शिवसेना औषधालाही ठेवणार नाही, असे सांगितले होते. तेच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह चोरल्यानंतर त्याच चिन्हावर आपल्या पुत्राला लढवण्यासाठी आता फिरत आहेत. हे शिंदे यांना मान्य आहे का? ते त्यांनी कुडाळमध्ये होणाऱ्या सभेमधून जाहीर करावे.’’
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगले मताधिक्य मिळेल. याचे कारण नारायण राणे यांनी आमदार, मुख्यमंत्री, विविध मंत्री पदे, विरोधी पक्ष नेते, केंद्रातील मंत्रिपदे अनेक पदे त्यांनी भुषवली. मात्र, ते सिंधुदुर्गचा विकास करू शकले नाहीत. आता ते विकासासाठी एक मत द्या, असे सांगत फिरत आहात. मात्र, सिंधुदुर्गच्या जनता मूर्ख नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. पण, त्याच महाराजांचा पुतळा या सरकारच्या कालावधीत भ्रष्टाचार करून जमीनदोस्त होतो. त्या सरकारमधील महायुतीच्या उमेदवारांना इथल्या मतदारांनी अक्कल घडवण्याची वेळ आली आहे. राणे हे पदासाठी कितीही पक्ष बदलू शकतात, म्हणूनच त्यांना कपडे बदलल्याप्रमाणे तुम्ही पक्ष बदलता असे काहीजण विचारतात. त्याचा त्यांना का राग येतो?’’
-----------------
शिंदे-फडणवीसांमध्ये गडी बाद करण्याचे प्रयत्न
सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे महायुतीचे उमेदवार असतानाही तेथे भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. संबंधित बंडखोर उमेदवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संभाषणाची क्लिप राज्यभरात प्रचंड व्हायरल करण्यात आली. हा प्रकार राज्यातील बऱ्याच मतदारसंघात सुरू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकमेकांचे गडी बाद करण्याचे काम करीत आहेत, असे श्रीमती अंधारी यांनी सांगितले.
---------------------
25429
ठाकरेंच्या काळात विकास नाही
नारायण राणे ः राजन तेली पराभवाची हॅट्रीक करतील
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १५ ः निवडणुकीत उमेदवाराने विकासात्मक विषयांवर बोलायचे असते. चांगल्या विचाराने, कतृत्वाने जनतेची मने जिंकायची असतात. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोणताच विकास झाला नाही. मुळात मुख्यमंत्री होण्याची पात्रता नसतानाही ते चुकून मुख्यमंत्री झाले. ही निवडणूक सर्वांसाठी महत्त्वाची असून महायुतीची सत्ता येणे आवश्यक आहे. जर महायुतीची सत्ता न आल्यास महाराष्ट्र परत मागे जाणार. त्यामुळे राजन तेली यांना पाडायची हॅट्रिक करून दीपक केसरकर यांना चौथ्यांदा आमदार बनवावे, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले.
येथील पिंपळेश्वर सभागृहात गुरूवारी (ता.१४) सायंकाळी महायुतीची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत महायुतीची उमेदवार दीपक केसरकर, पक्षनिरीक्षक नाईक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिंदे शिवसेना दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे यांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार राणे म्हणाले, ‘‘ही निवडणूक सर्वांसाठी महत्त्वाची आहे. कारण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोणताच विकास झालेला नाही. त्यांच्या कार्यकाळात कोकणात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले होते. यावेळी नुकसान भरपाईसाठी पैसे मागितले असता त्यांनी दिले नाही. त्यांच्या अशाच वागण्यामुळे शिवसेना आकसत चालली आहे. या निवडणुकीत त्यांचे २५ आमदारही निवडून येणार नाहीत.’’
यावेळी अपक्ष उमेदवार विशाल परब व महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्यावरही त्यांनी टीका केली. परब यांनी विधान परिषदेचे तिकीट मागितले होते व ते न दिल्यामुळे त्यांनी अर्ज भरला, असे म्हणत तेली हे पराभवाचे हॅट्रिक करणार असल्याचे ते म्हणाले.
श्री. केसरकर म्हणाले, ‘‘सावंतवाडी मतदारसंघासाठी जवळपास २५०० कोटी रुपयांचा निधी आणला. त्यामुळे तालुक्यातील सुद्धा अनेक विकास कामे झाली. साटेली भेडशी येथे उद्योग केंद्राच्या विजेसाठी अंडरग्राउंड केबल दिली. मात्र, ती चोरीस गेली. माझा स्वभाव प्रेमळ असला तरी असला प्रकार मी कदापिही खपवून घेणार नाही. चोरीस गेलेले साहित्य माझ्या खर्चातून देणार. पण, ज्याने हे गैरकृत्य केले त्याला अजिबात सोडणार नाही.’’ ज्या उमेदवाराला टुडे व टुमारो मधला फरक कळत नाही तो काय काम करणार? चेन्नईतून पैसे आणण्यासाठी आमदार होण्याची इच्छा असल्याचा आरोप नाव न घेता परब यांच्यावर केला. आमदार झाले की पोलिसांपासून वाचता येईल व पैसे आणता येईल. मात्र, पोलिसांपासून वाचता येण्यासाठी आमदार व्हायचे नसते तर जनतेची सेवा करण्यासाठी व्हायचे असते, असा टोलाही त्यांनी परब यांना लगावला. युवक, महिला व शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना काढल्या आहेत. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
-------------------
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माझ्याशी बोलू शकणार
मंत्रीपद मिळाल्यानंतर संपूर्ण राज्यातील जनतेकडे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे कामाचा व्याप खूप मोठा असतो. मात्र, या निवडणुकीनंतर कोकणातील ‘खाती’ देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुम्ही माझ्याशी थेट बोलू शकणार, अशी व्यवस्था मी करणार असल्याचे श्री. केसरकर म्हणाले.