माड्याचीवाडी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी
esakal November 16, 2024 02:45 AM

25433

माड्याचीवाडी चेकपोस्टवर
वाहनांची कसून तपासणी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १५ः राज्यात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने लागू असलेल्या आचारसहितेची अंबलबजावणी करण्यासाठी प्रशासकिय यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या पोलीस यंत्रणेकडून याबाबत जोमाने काम सुरु आहे. माड्याचीवाडी पोलीस चेकपोस्ट येथे पिंगुळी-पाट-परुळे मार्गावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची पोलीसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
निवडणूकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. निवती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी मोहीम राबविली जात आहे. यात पोलीस कॉनस्टेबल एस. पी. भुजबळ, एसएसटी पथकचे संतोष राऊळ, सत्यवान बोवलेकर, रोहित जाधव सहभागी झाले आहेत.
सध्या शाळांना दिवाळीची सुट्टी असल्यामुळे या मार्गावरून चिपी-परुळे विमानतळाकडे तसेच निवती, खवणे, भोगवे आदी ठिकाणी जाणाऱ्या-येणाऱ्या पर्यटकांची रहदारी जोरात सुरु आहे. या मार्गावरून नेहमीच मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल सुरु असते. ही निवडणूक निर्भय, शांत आणि न्याय वातावरणात पार पाडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा दिवस-रात्र काम करीत आहे. चारचाकी वाहनातून होणारी अवैध दारू, शस्त्र, रोख रक्कम, अमली पदार्थ व आदी वाहतूक यावर प्रभावी कारवाई होणे आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक वाहनांची चौकशी करून त्यांच्या संशयास्पद हालचालीवर पोलीस यंत्रणा अगदी बारकाईने लक्ष ठेऊन आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.