माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड November 16, 2024 10:13 AM

Dhananjay Munde on Sharad Pawar Group : आपल्याविरुद्ध (धनंजय मुंडे) लढण्यासाठी इच्छुकांची मोठी रांग होती, पण (राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून) तुतारीचा उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत असल्यानं, आपणच त्यांच्या एका नेत्याला फोन करुन लवकर उमेदवार फायनल करायला सांगितलं, असं वक्तव्य अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) नेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे. धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर एकच चर्चा रंगली आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू असतानाच राज्याचं लक्ष लागलेल्या परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांची प्रचार सभा पार पडली. घाटनांदूर येथील सभेत भाषणादरम्यान धनंजय मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं. माझ्या विरोधात तुतारीकडून लढण्यासाठी एवढे जण तयार झाले, त्यात काही तुतारीचे निष्ठावंत होते आणि ते मतदारसंघात फिरायला लागले. त्यांच्या नेत्याला विचारून मला भिडायला लागले. त्यांचे नेते येईल त्यांना म्हणायचे कामाला लागा, असं बारा-तेरा जणांसोबत झाल्यावर मलाच यांची काळजी वाटली, कारण तसं पाहिलं तर तिकीट तर, यातल्या एकालाच मिळणार म्हणून तुतारीच्या एका नेत्याला फोन लावला. त्यांना सांगितलं, लवकर तिकीट फायनल करा. तिकीट मिळालं नाही ते येडे झाले आणि कागद वेचत फिरायला लागले, पण मी इथला लोकप्रतिनिधी आहे, म्हणून त्यांची काळजी वाटली.", असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

काय म्हणाले धनंजय मुंडे? 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की, "माझ्या विरोधात तुतारीकडून उमेदवार, एवढे ते उतावळे झाले. त्यात काही निष्ठावंत होते. फिरायला लागले, त्यांच्या नेत्याला विचारुन फिरायला लागले. त्यांचे नेतेही जे येईल, त्याला म्हणायचे लागा कामाला, तिकीट तुम्हालाच... एका घरातून तिघं... आई बी, लेक बी, जावई बी... एवढ्यावरच थांबले नाहीत, अनेकजण नडायला लागले. पण, 12 ते 13 जण झाल्यावर मलाच या सगळ्यांची काळजी वाटली. मी म्हटलं की, तुतारीचे जरी असले, नेते जरी असले, आपल्याला आदरणीय जरी असले, तर मलाच काळजी वाटली... कारण तिकीट कुणालातरी मिळणार एकालाच आहे. सगळेच्या सगळे एवढ्या ताकडीनं कामाला लागले. त्यामुळे याच्यातल्या एकाला जरी तिकीट मिळणार असलं, तर बाकीच्यांचं कसं व्हायचं... म्हणून तुतारीच्या एका नेत्याला मीच फोन लावला आणि म्हटलं बाबा लवकर फायनल करा... तिकीट मिळालं नाही आणि त्यातले दोघं वेडे झाले आणि फिरायला लागले, तर शेवटी इथला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची काळजीसुद्धा मलाच करावी लागेल ना..." 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.