'श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले'; जयंत पाटलांनी घातला सुनील टिंगरेंवर वर्मी घाव, म्हणाले 'पोलिस स्टेशमध्ये पिझ्झा...'
शिवानी पांढरे November 16, 2024 12:43 PM

पुणे: विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे. अशातच प्रचारादरम्यान मोठ्या टिकेची झोड उडताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर प्रचारसभेवेळी शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे. कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे अपघातप्रकरणी जयंत पाटलांनी सुनील टिंगरेंना लक्ष्य केलं आहे. श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

एखाद्या आमदाराने गरिबासाठी रात्र काढली तर त्याचे कौतुक होतं. मात्र, हे आमदार श्रीमंताच्या मुलाचे चोचले पुरवण्यासाठी एखाद्या नोकरासारखी रात्रपाळी करत बसले होते. अशा आमदाराला आता घरी बसवा अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वडगावशेरीचे विद्यमान आमदार जहरी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील यांची आज धानोरीत जाहीर सभा पार पडली. या सभेत जयंत पाटील यांनी सुनील टिंगरे यांचा चांगलाच समाचार घेतला.

नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?

'पंतप्रधान मोदी यांनी एक हुल दिली आणि आमच्या पक्षातले सगळे बहाद्दर तिकडे गेले. त्या सगळ्यांच्या मागे या वडगाव शेरी मतदार संघातला एक गद्दार देखील निघाला तोही गद्दारी करण्यासाठी तिथे गेला ठीक आहे जा बाबा पण महाराष्ट्रातील विधानसभेच्या सदस्या कडून काय अपेक्षा पाहिजे असा संवाद देखील यावेळी उपस्थित करत जयंत पाटील पुढे म्हणाले मगाशी आपण श्रद्धांजली वाहिली त्या कल्याणी नगर मध्ये पोर्शे कार भरधाव वेगात चालवून एक अपघात झाला त्या अपघातात दोघांनी आपले प्राण गमावले त्या दोघांचा मृत्यू झाला. त्या दोघांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आमदार गेला असता आणि ते दोघं हॉस्पिटलमध्ये जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले गेले असते तर कदाचित बापूसाहेब तुम्हाला उभं राहण्याची गरज लागली नसती'.

'मात्र, हा बहाद्दर पोलीस स्टेशनमध्ये गेला पिझ्झा खायला दिला रात्रभर त्यांच्यासाठी काढली. गरिबांसाठी आमदाराने रात्र काढली तर त्याचं कौतुक होतं. पण, श्रीमंत पोराचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकऱ्या सारखे रात्रभर नाईट ड्युटी करत बसले अशा आमदाराला घरी घालवण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही असल्या श्रीमंतांची नोकरी करणाऱ्या आमदारांना घरी पाठवणं आणि बापूसाहेब पठारे यांच्यासारखा नम्र आणि प्रामाणिक या मतदारसंघाच्या विकासासाठी 24 तास विचार करू शकतो तुमच्या विकासाचा पुढचा पाऊल टाकण्याचा प्रयत्न तो करू शकतो अशा उमेदवाराला तुमचं मत द्या', असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.