विक्रोळी मतदारसंघाचा बालेकिल्ला सुनील राऊत राखणार की शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे धक्का देणार?
रोहित धामणस्कर November 16, 2024 02:43 PM

Vikhroli Vidhan Sabha constituency: गेल्या अनेक वर्षांपासून सुनील राऊत यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील (Vikhroli Vidhan Sabha) यंदाची लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. विक्रोळी विधानसभा मतदारसंघात 2014 आणि 2019  अशा सलग दोनवेळेला सुनील राऊत (Sunil Raut) निवडून आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात त्यांचे पारडे जड मानले जात आहे. संजय राऊत हे सुनील राऊत यांचे बंधू असल्यामुळे त्यांची ताकद कैकपटीने वाढली आहे. मात्र, 2009 साली या मतदारसंघात राज ठाकरेंच्या करिष्म्यामुळे मनसेचे मंगेश सांगळे विजयी झाले होते. या मतदारसंघात मनसेला मानणाराही मतदार वर्ग आहे. विक्रोळी विधानसभा मतदारसंघात यंदा सुनील राऊत यांच्यासमोर शिंदे गटाच्या सुवर्णा करंजे आणि मनसेच्या विश्वजित ढोलम यांचे आव्हान आहे.  

सुवर्णा करंजे यांच्या पाठिशी महायुतीची ताकद उभी आहे. प्रचारादरम्यान सुनील राऊत यांनी सुवर्णा करंजे यांच्याविषयी केलेली आक्षेपार्ह टिप्पणी गाजली होती. याप्रकरणी सुवर्णा करंजे यांनी सुनील राऊत यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल केला होता. त्यामुळे विक्रोळीतील यंदाची लढत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. सुनील राऊत आपला बालेकिल्ला राखतात की गमावतात, हे पाहावे लागेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.