छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. 18 नोव्हेंबरनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. दरम्यान, अवघे काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे नेतेमंडळी पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. भाषणं, सभा, कॉर्नर बैठका असे सत्र राज्यभरात चालू आहे. दरम्यान, याच प्रचारादरम्यान, भाषणात काही नेतेमंडळी भावूक होताना पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगरात एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनाही भर सभे अश्रू अनावर झाल आहेत.
इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपल्या प्रचारार्थ एक सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी धडाकेबाज भाषण केले. याच भाषणात त्यांनी आपल्या आईसोबतच्या आठवणी सांगितल्या. आपल्या आईच्या निधनाची घटना सांगता त्यांना अश्रू अनावर झाले. ते भर सभेत भाषण चालू असतानाच रडू लागले.
"22 मार्च 2022 या दिवशी मी माझं संपूर्ण जग हरवून बसलो. या दिवसाच्या साधारण 20 दिवसांआधी रात्री 10 वाजता मी माझ्या आईसोबत गप्पा-गोष्टी करत होतो. त्यावेळी भविष्यात काय होणार आहे? याची मला कल्पना नव्हती. त्यावेळी मी आईला म्हणालो की आई मला एका भोजनाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. मी जाऊन परत येतो. असं बोलून मी निघून गेलो. मला घरी पोहोचायला उशीर झाला," अशी आठवण जलील यांनी सांगितली.
"दुसऱ्या दिवशी माझ्या भावाचा मला फोन आला की माझ्या आईला ब्रेन स्ट्रोक आला आहे. त्यानंतर पुढचे 20 दिवस फार कठीण होते. ते दिवस मी रुग्णालयात काढले. मला माझ्या आईला माझा संपूर्ण वेळ द्यायचा होता. माझ्या आईच्या हृदयाची धडधड कशी कमी होत होती, ते मी मशीनवर बघत होतो. मला वाटतंय की माझी आई शांततेने माझा आवाज ऐकत असावी. मी सगळं सोडायला तयार होतो. मला आमदारकी नको होती, खासदारकी नको होती. कदाचित हे सगळं माझी आई ऐकत होती. मला माझ्या आईसोबत राहायचं होतं," असं सांगताना जलील यांना भरून आलं.
"प्रत्येकजण आपल्या आईवर फार प्रेम करतो. माझी आई माझ्यासाठी जग होती. माझ्या आईला जाऊन बरीच वर्षे झाली. मी गेल्या 10 वर्षांत लोकांमध्ये गेलो. या काळात मी माझ्या आईला वेळ देऊ शकलो नाही. रात्रीचा एक वाजूदेत किंवा दोन वाजूदेत ती माझी वाट पाहायची. ती माझी वाट पाहायची. कधी गाडी येईल. माझा गुड्डू कधी येईल, असं तिला वाटायचं. रुग्णालयात असताना माझ्या आईने डोळे उघडले असते, तर कदाचित मी पुन्हा राजकारणात आलो नसतो. जगात तुम्ही नाव कमवू शकता, श्रिमंती मिळू शकते. पण ज्यांच्याकडे आई असते, ते फार नशीबवान आहेत," असंही जलील यांनी सांगितलं.
"माझ्या वडिलांचे निधन साधारण 30 वर्षांपूर्वी झाले. तुम्ही मला मतदान करा किंवा करू नका. पण भविष्यात मला एखाद्याची आई भेटली आणि तुमच्या बोलण्यामुळेच माझा मुलगा आमचा मुलगा आमच्यावर प्रेम करतो, असं कोणी म्हटलं तर यातच माझा विजय आहे," असं म्हणत त्यांनी प्रत्येक तरुणाने आपल्या आई-वडिलांची काळजी घ्यायला हवी, असं अवाहन केलं.
View this post on Instagram