तुमसर विधानसभेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत, कोण मारणार बाजी?
प्रशांत देसाई November 16, 2024 03:43 PM

Tumsar Vidhan Sabha constituency: तुमसर विधानसभा निवडणूक (Tumsar Vidhan Sabha constituency) यावेळी हायव्होल्टेज निवडणूक होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. इथे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे आहेत. महायुतीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore ) हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीच्या वतीने शरद पवारांच्या पक्षाकडून इथे भाजपाकडून आयात केलेले चरण वाघमारे (Charan Waghmare) यांना एनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक रिंगणात उतरवले. त्यामुळे तुमसर विधानसभेची निवडणूक ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत आहे. 

शरद पवारांची साथ सोडून अजित पवार बाहेर पडल्यानंतर तुमसरचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे हे सुद्धा भंडारा-गोंदियाचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांच्यासोबत अजित पवारांसोबत गेलेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. अशा स्थितीत जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांनी शरद पवारांची साथ देण्याचे ठरवले. ज्या स्थानिक नेत्यांनी शरद पवारांचा पक्ष तुमसरात वाढविला त्यांनाचं विधानसभेची उमेदवारी द्यावी, बाहेरून कुणालाही आयात करू नये, असा इशारा स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता. 

मात्र, शरद पवारांच्या पक्षानं एनवेळेवर स्थानिक नेत्यांना आणि महाविकास आघाडीच्या सुद्धा नेत्यांना विश्वासात न घेता भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांना ऐनवेळी पक्षात प्रवेश देत त्यांना उमेदवारी दिली. यामुळे चरण वाघमारे यांना प्रचंड विरोध असतानाही उमेदवारी दिल्याने आता शरद पवार पक्षाचे स्थानिक नेते आणि महाविकास आघाडीचे नेते चरण वाघमारे यांच्या प्रचारात कुठेही दिसत नाहीत .किंबहुना ते वाघमारे यांच्या विरोधात प्रचार करीत असल्याची माहिती समोर येतेय. 

राजू कारेमोरे हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात

महायुतीकडून राजू कारेमोरे हे दुसऱ्यांदा निवडणूक रिंगणात असून मागील पाच वर्षात त्यांनी केलेले काम आणि जनसंपर्क या भरोशावर पुन्हा एकदा जनता त्यांना निवडून देतील असा विश्वास व्यक्त करीत आहेत. तर महाविकास आघाडीची उमेदवारी घेणारे चरण वाघमारे यांच्यासमोर स्थानिक नेत्यांची डोकेदुखी असली तरी त्यांच्या विकास फाउंडेशनच्या माध्यमातून आणि मागील पाच वर्षात पासून ते नागरिकांच्या संपर्कात सातत्याने असल्याने त्यांनीही विजय निश्चितेचा दावा केला आहे. 

तुमसर विधानसभेची निवडणूक 353 मतदान केंद्रावर होत आहे. तुमसर विधानसभेत तीन लाख 9 हजार 727 मतदार मतदानाचा हक्क बजावणारा असून यात एका तृतीयपंथीय मतदाराचा समावेश आहे. तुमसर येथे एक लाख 55 हजार 410 पुरुष मतदार असून एक लाख 54 हजार 316 स्त्री मतदारांची संख्या आहे. या विधानसभेत 19 उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी खरी लढत ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होत आहे. 

ही बातमी वाचा : 

Sakoli Vidhan Sabha constituency: नाना पटोले पाचव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, तिहेरी लढतीमध्ये कोण मारणार बाजी?

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.