Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रथमच सर्वाधिक गुंतागुंतीची निवडणूक 2024 मध्ये होत आहे. राज्यातील शक्तिशाली असलेले दोन प्रादेशिक पक्ष फुटल्यानंतर त्यांची आता दोन शकले झाली आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये दोन आघाड्या सुद्धा झाल्या आहेत. आणि दोन आघाड्यांमध्ये सहा पक्ष असल्याने निवडणुकीचा कल नेमका कोणाच्या बाजूने लागेल, याचा अजूनही अंदाज आलेला नाही.
दरम्यान महाराष्ट्राची जनता कोणाच्या हातामध्ये पुन्हा एकदा सत्ता देणार? याचं उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार असलं तरी अजूनही मतदार अजूनही शांत आहेत. त्यामुळे नेमका कौल कोणाच्या वाट्याला जाणार याची उत्सुकता आहे. मात्र, 2019 मध्ये ज्या काही घडामोडी घडल्या होत्या आणि त्यानंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे आणि शिवसेना फोडली त्यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीला सुरुंग लावला. यामुळे जी काही राजकीय खिचडी होऊन गेली आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा मतदार कोणाला साथ देतो याकडे लक्ष असेल. अर्थातच या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठाकरे पवार राहिले आहेत. त्यामुळे या दोन नेत्यांची 2019 मध्ये कोणती भूमिका होती यावर आपण नजर मारणार आहोत.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडीतील सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. मोदी लाटेत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता आणि 123 जागा या निवडून आल्या होत्या. त्यानंतर शिवसेना 63 काँग्रेस 42 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागा जिंकली होती. भाजप जरी मोठा पक्ष ठरला असला तरी भाजपकडे बहुमत नव्हतं बहुमतासाठी त्यांना 22 जागा आवश्यक होत्या. स्वबळावर लढलेले भाजप आणि शिवसेना सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा एकत्र येतील असं वाटत असताना राज्यात स्थिर सरकार यावं यासाठी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली.
दरम्यान, शरद पवारांच्या या भूमिकेची त्यावेळी मोठी चर्चा झाली, अनेकांनी या भूमिकेचे वेगवेगळे अर्थ घेतले. काहीजणांनी शिवसेना-भाजपमध्ये ठिणगी पडावी यासाठी पवारांनी ही भूमिका घेतल्याचे म्हटलं, तर काहींनी आपला पक्ष भाजप बहुमतासाठी फोडेल अशी भीती वाटल्याने ही भूमिका पवारांनी घेतल्याचं बोललं गेलं. मात्र, त्यानंतर शिवसेना आणि भाजप युतीचे सरकार स्थापन केलं.
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना पक्ष स्वबळावर न लढता एकत्र युती लढले. यामध्ये भाजपला 105, शिवसेनेला 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसने 44 जागा निवडून आणल्या. यावेळी सुद्धा भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार स्थापन करणार असं दिसत असताना अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या शिवसेनेचे आग्रहामुळे भाजप सेना युती तुटली आणि शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात पकडत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत असताना शरद पवार हेच मुख्य सूत्रधार होते. शिवसेना आणि काँग्रेस वेगळ्या विचारसरणीचे आणि टोकाचा विरोध असलेले पक्ष एकत्र आणण्यास शरद पवारांनीच मोठी मध्यस्थी केल्याचा चित्र दिसलं. इतकंच काय तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा नावाचा प्रस्ताव सुद्धा शरद पवारांनी समोर आणला.
इतर महत्वाच्या बातम्या