कुडाळ मालवण मतदारसंघात निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक रंगणार सामना; कोण मारणार बाजी?
सदाशिव लाड, एबीपी माझा November 16, 2024 07:43 PM

Kudal Assembly Constituency 2024 : कुडाळ (Kudal) मालवण विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून आरोप, प्रत्यारोप केले जात आहेत. विकासाच्या नावाने या मतदारसंघात गेल्या काही वर्षात एकही मोठा प्रकल्प आलेला नसून रोजगार, पर्यटनाला चालना, पाणी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघात (Kudal Assembly Constituency) डिज्नीलँड, सी वर्ड असे पर्यटन पूरक प्रकल्प रखडले आहेत. मालवणला पर्यटनाची राजधानी देखील म्हटलं जातं, त्यामुळेच असे पर्यटन पूरक प्रकल्प होणं गरजेचे आहे. दुसरीकडे टांळाबा सारखा धरण प्रकल्प गेली कित्येक वर्ष लालफीतीत अडकून पडला आहे. तर कुडाळ शहराच्या नजदीक असलेली औद्योगिक क्षेत्रात कोणतेही मोठे प्रकल्प नसल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न या मतदारसंघात उद्भवत आहे. 

कुडाळ मालवण मतदारसंघात विद्यमान आमदार वैभव नाईक हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. तर माजी खासदार निलेश राणे हे महायुतीचे उमेदवार असतील. निलेश राणे हे धनुष्यबाण या चिन्हावरून लढतील. मात्र गेले तीन ते चार वर्ष माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ मालवण मतदारसंघात काम सुरू केलं आहे. 

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना झाली हाच मुद्दा यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीत अग्रस्थानी राहणार आहे. भ्रष्टाचारामुळे हा पुतळा कोसळल्याचा आरोप विरोधकांकडून आतापासूनच रान पेटवायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे या मतदारसंघात विकासाच्या बाबतीत कोणतेही नवे प्रकल्प आलेले नसून मच्छीमार पर्यटन व्यवसायिक शेतकरी युवा वर्ग यांच्यासाठी देखील भरीव काम झालेली पाहायला मिळत नाही.

माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पारंपरिक मतदारसंघ असलेला हा मतदारसंघ 2014 ला नारायण राणे यांचा पराभूत करून वैभव नाईक जॉईंट किलर ठरले होते. त्यानंतर 2019 ला वैभव नाईक यांनी कट्टर राणे समर्थक असलेले रणजीत देसाई यांचा पराभव करून दुसऱ्यांदा आमदार झाले. आता वैभव नाईक तिसऱ्यांदा विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार नारायण राणे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे राणे विरुद्ध नाईक असा जुनाच संघर्ष पुन्हा एकदा कुडाळ मालवण या मतदारसंघात पहायला मिळणार आहे.

माजी खासदार निलेश राणे हे 2009 ला पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 ला दोन वेळा पराभूत झाले. आता कुडाळ मालवण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. निलेश राणेंना लोकसभेला दोन वेळा पराभूत करणाऱ्या विनायक राऊतांचा वडील नारायण राणे यांनी पराभव केला. त्यामुळे मुलाच्या पराभवाचा वचपा वडिलांनी घेतला आता वडिलांच्या पराभवाचा वचपा मुलगा काढणार का हेही पाहावं लागणार आहे. 

2009 मध्ये जिल्ह्यातील मतदारसंघांची पुर्नरचना झाली. या पुनर्रचनेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ तयार झाला. या निवडणुकीत नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक याचा पराभव करत सहजरित्या विजय मिळवला. मात्र 2014 च्या निवडणुकीत याच मतदार संघातून नारायण राणे यांना वैभव नाईक यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. वैभव नाईक जायंट किलर म्हणून समोर आले. मात्र 2014 चा पराभव नारायण राणे यांच्या जिव्हारी लागला. याबाबतची सल नारायण राणे यांनी वारंवार बोलून दाखवली. त्यानंतर वैभव नाईक 2019 मध्ये सुध्दा नारायण राणे यांचे शिलेदार रणजित देसाई यांना पराजित करून दुसऱ्यांदा विधानसभेत गेले. आता मात्र राजकीय स्थित्यंतरात अनेक घडामोडी घडल्या आहेत. एकसंघ असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा विभागली. 

2009 विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून 71,921 मिळवत वैभव नाईक यांचा पराभव केला. 2014 ला नारायण राणेंचा पराभव करणार वैभव नाईक यांनी 70,582 मत घेत जायंट किलर म्हणून समोर आले. 2019 ला वैभव नाईक यांनी राणेंचे शिलेदार रणजित देसाई यांचा पराभव करत 69.168 मत मिळवली. आता राणे विरुद्ध नाईक अशी थेट लढत पुन्हा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात हाय हाय हॉलटेज ड्रामा होणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.