पुणे, ता. १५ ः ‘लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशन’, ‘पुणे महापालिका’ आणि ‘पिंपरी-चिंचवड महापालिका’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार (ता. १७) ते गुरुवारपर्यंत (ता. २१) ‘ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदा या कार्यक्रमाचे पाचवे वर्ष आहे. ‘तरुणांची आजीविका बदलणे : संपूर्ण संभाव्यतेचे मार्ग’ या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम बालेवाडी मैदान येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्याची संस्कृती असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार आहे. सर्वसमावेशक आर्थिक मार्ग तयार करण्यासाठी ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी दोन हजारांहून अधिक माजी विद्यार्थी, ३०० युवा नेते, ११ देशांतील १५हून अधिक समुदायातील सहयोगी सहभागी होणार आहेत.
यावेळी लाइटहाऊस कम्युनिटीज फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन, भारतातील यूएस राजदूत एरिक गार्सेटी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापालिका आयुक्त शेखर सिंग, पुणे महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्कचे संचालक जेमी मॅकऑलिफ, आद्याच्या संस्थापक सायली मराठे उपस्थित असणार आहेत.