ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर 13 धावांनी विजय, टी20 मालिका 2-0 ने घातली खिशात
GH News November 16, 2024 09:10 PM

टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला 13 धावांनी पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 9 गडी गमवून 147 धावा केल्या आणि विजयासाठी 148 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानचा संघ 19.4 षटक खेळून सर्वबाद 134 धावा करू शकला. पाकिस्तानला 13 धावा कमी पडल्या आणि मालिकाही हातातून गमावली आहे. वनडे मालिका जिंकल्यानंतर पाकिस्तानकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण सलग दोन टी20 सामने गमवून मालिका हातातून घालवली आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्पेन्सर जॉनसन याने पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. त्याने 4 षटकात 26 धावा देत 5 गडी बाद केले. तर एडम झाम्पाने 4 षटकात 19 धावा देत 2 गडी बाद केले. तर झेव्हिसर बर्टलेटने एक गडी बाद केला. पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक 52 धघावा केल्या. तर इरफान खानने 37 धावांची खेळी केलीय या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. टी20 क्रिकेटमध्ये इतका कमी स्कोअर रोखण्याची ऑस्ट्रेलियाची ही चौथी वेळ आहे.

या मालिकेतील पहिल्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 7 षटकांचा करण्यात आला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाने 7 षटकात 4 गडी गमवून 93 धावा केल्या आणि विजयासाठी 94 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान काही पाकिस्तानला गाठता आलं नाही. पाकिस्तानने 7 षटकात 9 गडी गमवून 64 धावा केल्या आणि 29 धावांनी दारूण पराभव झाला. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी काहीही करून हा सामना जिंकणं भाग होतं. पण तसं झालं नाही. या मालिकेतील औपचारिक तिसरा आणि शेवटचा सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर/कर्णधार), बाबर आझम, उस्मान खान, आगा सलमान, इरफान खान, अब्बास आफ्रिदी, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, सुफियान मुकीम.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मॅथ्यू शॉर्ट, जेक फ्रेझर-मॅकगर्क, जोश इंग्लिस (विकेटकीपर/कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, मार्कस स्टॉइनिस, आरोन हार्डी, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, स्पेन्सर जॉन्सन

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.