Ganesh Bhokre : धंगेरकरांचा भाजपने फुटबॉल केला अन् त्यानंतर ते काँग्रेसमध्ये...; गणेश भोकरेंचा हल्लाबोल
एबीपी माझा वेब टीम November 16, 2024 09:13 PM

पुणे : "रवींद्र धंगेकर  (Ravindra Dhangekar) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ओळख दिली. अनेक पदे दिली. मात्र, पक्षाशी प्रतारणा करीत भाजप, काँग्रेसची दारे ठोठावली. मनसैनिकांच्या मदतीवर निवडून आलेल्या धंगेकरांनी मनसेवर टीका करणे हे कृतघ्नपणाचे लक्षण आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेला बिनशर्त पाठिंबा भाजपचे उमेदवार हेमंत रासने विसरले आहेत. कृतघ्नवृत्तीच्या अशा लोकांना यावेळी कसबावासीय घरी बसवतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी व्यक्त केला. काही वर्षांपूर्वी रविंद्र धंगेरकरांचा भाजपने फुटबॉल केला होता त्यानंतर ते कॉंग्रेसमध्ये आले, अशीही टीका त्यांनी धंगेकरांवर केली.

गणेश भोकरे म्हणाले, "यंदा राज्यात मनसेची सुप्त लाट असून, 40 आमदार निवडून येतील. आम्ही टोलविरोधात आंदोलन केले आणि राज्यात 65 टोलनाके बंद केले. मनसे स्वतंत्र पक्ष आहे. राज ठाकरे सातत्याने पक्षाची भूमिका मांडत असतात. कसबामध्ये आमदार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात मतदारांमध्ये प्रचंड नाराजी असून, त्यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गतही विरोध आहे. गेल्या 30 वर्षांपासून भाजपचा आमदार येथे आहे आणि आता काँग्रेसचा आमदार आहे. पण लोकांच्या दैनंदिन समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या स्वार्थी राजकारणाला वैतागलेली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे."

रवींद्र धंगेकर 2017 मध्ये मनसेमधून बाहेर पडले. सुरवातीला भाजपकडे गेले. पण त्यांनी पक्षात घेतले नाही. नंतर ते काँग्रेस पक्षात गेले आणि आमदार झाले. ज्या मनसेने त्यांना घडवले, त्यावर आज ते खालच्या भाषेत टीका करत आहेत, यातून त्यांची कृतघ्नता दिसून येते. 2014 मध्ये कसब्यात धंगेकर यांनी मनसेचा उमेदवार असतानाही नेमके कोणत्या उमेदवाराचे काम केले आणि पैसे वाटले हे आम्हाला माहिती आहे. अनेक प्रकरणांमध्ये सेटलमेंट करण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे लवकरच उघडी करणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

कसब्यात तिहेरी लढत 

कसबा विधानसभा मतदार संघात यंदा तिहेरी लढत होणार आहे.भाजपचे हेमंत रासने, कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि मनसेच्या गणेश भोकरे यांच्यात लढत होत आहे. त्यात एकमेकांवर सतत आरोप- प्रत्यारोप सुरु आहे. हाय व्होल्टेज मतदार संघ म्हणून या मतदारसंघाची सध्या ओळख निर्माण झाली आहे. या मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार, हे पाहणं  महत्वाचं आहे. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.