Gold ETF: नवा विक्रम! गोल्ड ईटीएफवरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला; काय आहे कारण?
esakal November 16, 2024 07:45 PM

What is Gold ETF: जगभरातील ज्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे सोन्यात गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी गोल्ड ईटीएफ हे गुंतवणुकीचे एक चांगले साधन बनले आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, भारतीय गोल्ड ईटीएफकडे असलेले सोने गेल्या चार वर्षांत जवळपास दुप्पट होऊन 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 54.5 टनांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे.

चार वर्षांपूर्वी या काळात ते 27.4 टन होते. भौगोलिक-राजकीय अस्थिरता, सेंट्रल बँकेच्या धोरणांमधील बदल आणि इक्विटी मार्केटमध्ये सुरू असलेले चढ-उतार यामुळे ही वाढ झाल्याचे मानले जात आहे.

या सेगमेंटने लहान आणि मोठ्या गुंतवणूकदारांकडून चांगली गुंतवणूक आकर्षित केली आहे. म्युच्युअल फंड इंडस्ट्री बॉडी AMFI च्या मते, देशांतर्गत गोल्ड ईटीएफमध्ये गेल्या 21 महिन्यांत 12,448 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली आहे.

गेल्या 15 वर्षांमध्ये, विशेषत: 2011, 2020 आणि 2024 मधील अनिश्चिततेच्या काळात, गोल्ड ETF मध्ये भरपूर वाढली आहे. आकडेवारीनुसार, देशांतर्गत गोल्ड ईटीएफमध्ये 2011 मध्ये 17 टन, 2020 मध्ये 14 टन आणि 2024 मध्ये 12 टन सोन्याची भर पडली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 नंतर, गोल्ड ईटीएफ खूप आकर्षक झाले आहेत. नवीन कर रचनेनुसार, सोने एका वर्षापेक्षा जास्त काळ ठेवल्यास, गोल्ड ईटीएफच्या युनिट्सच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावर 12.5 टक्के भांडवली नफा कर आकारला जाईल. यापूर्वी, होल्डिंग कालावधी विचारात न घेता स्लॅब दरांनुसार नफ्यावर कर आकारला जात होता.

गोल्ड ईटीएफ म्हणजे काय?

गोल्ड ईटीएफला गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणतात. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी हा कमोडिटी आधारित फंड आहे. सोप्या शब्दांत तुम्ही असेही म्हणू शकता की, गोल्ड ईटीएफ म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोने खरेदी करण्यासारखे आहे. या गुंतवणुकीची खास गोष्ट म्हणजे कमीत कमी पैशातही तुम्ही यामध्ये गुंतवणूक करू शकता.

गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणुकीचे फायदे

तुम्ही शेअर्सप्रमाणे स्टॉक एक्सचेंजवर गोल्ड ईटीएफ खरेदी आणि विक्री करू शकता. यामध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्यक्ष सोने खरेदी करण्याची गरज नाही, त्यामुळे चोरी किंवा तोटा होण्याची भीती नाही.

सोन्याचे दागिने किंवा नाणी ठेवण्यापेक्षा ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे चांगले आहे कारण यामुळे लॉकर इत्यादीचा खर्च वाचतो. गोल्ड ईटीएफ खरेदीवर 1% आणि त्याहूनही कमी ब्रोकरेज चार्ज आहे. पण सोन्याच्या दागिन्यांचा मेकिंग चार्ज जास्त आहे. तुम्ही गोल्ड ईटीएफ गुंतवणुकीवर कर्ज देखील घेऊ शकता.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.