Kankavli Assembly Constituency 2024 : कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे हे महायुतीचे उमेदवार निश्चित असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून संदेश पारकर हे उमेदवार आहेत. मविआचा कोणीही उमेदवार असला तरी या उमेदवारासमोर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक खऱ्या अथनि लक्षवेधी ठरणार आहे.
नितेश राणे हे 2014 पासून कणकवली विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यावेळी झालेल्या पंचरंगी निवडणुकीत काँग्रेस उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या नितेश राणे यांनी सुमारे 75 हजार मते घेत जवळपास 26 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यावेळी भाजपचे उमेदवार प्रमोद जठार यांचा पराभव केला होता. त्यानंतर राजकीय समीकरणे बदलली आणि नितेश राणे यांनी भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात युती असताना कणकवली विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपच्या वाट्याला आलेल्या या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्याविरुद्ध शिवसेनेने सतीश सावंत यांना अधिकृत उमेदवारी देवून रिंगणात उतरवले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांच्यासाठी मतदारसंघात सभा घेवून ताकद दिली होती तर राणेंशी राजकीय शत्रुत्व असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सतीश सावंत यांच्यासाठी कणकवलीत खास प्रचारसभा घेतली होती. त्यावेळी दोन्ही बाजूने विजयासाठी जोरदार प्रचारयंत्रणा राबवण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या लढतीत कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांनी 28 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळवत सिंधुदुर्गात भाजपचे खाते खोलले होते. त्यावेळी नितेश राणे यांना तब्बल 84 हजार 504 मत मिळवत शिवसेनेचे सतीश सावंत पराभव केला होता.
आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता राजकीय समीकरणे खूप बदलली आहेत, गेल्या 5 वर्षात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या मतदारसंघावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे.
राजकीय बलाबल पाहता काँग्रेसच्या तुलनेत उबाठा शिवसेनेची ताकद अधिक आहे. मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांनी चांगली लढत दिली होती. त्यामुळे ठाकरे शिवसेना या मतदारसंघात दावा करणार हे निश्चित आहे. ठाकरे शिवसेनेकडून मागील विधानसभा लढवलेले कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, या मतदारसंघाचे संपर्कप्रमुख अतुल रावराणे आणि युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी सुशांत नाईक यांनी गेल्या वर्षभरापासून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.
कणकवली विधानसभा मतदारसंघात रोजगाराचा आणि पाण्याचा प्रश्न आहे. रोजगाराच्या शोधात या भागातून मोठ्या प्रमाणात मुंबई पुण्यासारख्या शहरात अनेक कुटुंब गेल्याचं पाहायला मिळत आहे. नाणार रिफायनरीचा प्रकल्प रखडल्याने रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघात आनंदवाडी प्रकल्प गेले अनेक वर्ष रखडलेला आहे. सोबतच पर्यटनाला देखील चालना मिळणं गरजेचा आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा मानला जाणारा करूळ घाट गेले दहा महिने बंद असल्याने या निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा असणार आहे.
नितेश राणे हिंदूंचे गब्बर म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण करत असले तरी देखील त्यांच्याच मतदारसंघात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदार देखील आहे. त्यामुळे या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी ते कशा पद्धतीने प्रयत्न करणार हे देखील पहावं लागणार आहे.