हिवाळा ऋतू हा अनेकांना खूप आवडतो. पण या ऋतूमध्ये आजारी पडण्याचा धोकाही अधिक असतो. तापमान खाली उतरल्यावर लोकांना लगेच संसर्ग होऊ लागतो. अशात सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी इत्यादी समस्या निर्माण होतात. याव्यतिरिक्त हिवाळा ऋतूत आपली त्वचाही अगदी कोरडी, निस्तेज आणि निर्जीव होते. जर तुम्हीदेखील या समस्यांचा सामना करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतो.
खरंतर, आरोग्यतज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे वातावरणातील बदल हा हानिकारक व्हायरस आणि बॅक्टेरियांच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतो. यामध्ये ह्युमन रायनोव्हायरस हा थंडीच्या ऋतूमध्ये सगळ्यात जास्त वाढतो. आणि याच व्हायरसमुळे आजार होण्याच्या प्रमाणामध्ये 40 टक्क्यांनी वाढ होते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या व्यक्ती जेव्हा या व्हायरसच्या संपर्कात येतात तेव्हा संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो. अशात या ऋतूमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे फार गरजेचे आहे. याचसाठी जाणून घेऊयात काही असे सुपरफूडस ज्यांचे हिवाळ्यात सेवन केल्यास तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकेल.
– जाहिरात –
आरोग्यतज्ज्ञ हिवाळ्यात विशेषत: सायट्रस फ्रूटस म्हणजेच आंबट फळं खाण्याचा सल्ला देतात. हिवाळ्यात लोक तळलेले, भाजलेले आणि मसालेदार चटपटीत पदार्थ अधिक खातात. सोबतच या ऋतूत थंड हवा जास्त असल्यामुळे लोक फारसा व्यायामही करत नाहीत. त्यामुळेच मसालेदार पदार्थांना पचवणे शरीरासाठी अवघड होऊन बसते. पचनक्रिया हळू होत असल्यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, सूज इत्यादी समस्या व्यक्तिला घेरतात. आंबट फळांचे सेवन केल्यास या समस्यांपासून आराम मिळू शकतो.
– जाहिरात –
खरंतर सायट्रस फ्रूटसमध्ये जास्त प्रमाणात फायबर आढळते. जे पचनशक्ती मजबूत करते. याव्यतिरिक्त फायबर रिच फूडमुळे तुम्हाला बऱ्याच वेळासाठी तुमचे पोट भरलेले वाटते. त्यामुळेच थंडीत तुमचं वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सायट्रस फ्रूटस फायदेशीर ठरू शकतात. सायट्रस फ्रूटसमध्ये असणारं व्हिटामिन सीदेखील इम्युनिटी वाढवण्यासोबतच स्किनसाठीही गुणकारी असते. तुम्ही संत्रे, लिंबू, मोसंबी, ग्रेपफ्रूट यांचा समावेशही तुमच्या आहारात करू शकता.
थंडीचा मौसम सुरू झाला की बाजारात रताळ्यांची विक्री होण्यास सुरुवात होऊ लागते. हे स्वादिष्ट तर असतातच सोबत यांच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदेही मिळतात. रताळ्यांमध्ये आयर्न, फोलेट, कॉपर, मॅग्नेशियम इत्यादी शरीरासाठी आवश्यक असणारे घटक अधिक प्रमाणात असतात. यात असणारे व्हिटामिन ए शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यासोबतच हे स्किन, केस आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही आवश्यक असते.
बदाम, चिया सीडस् , अळशीच्या बिया इत्यादी ड्रायफ्रूटस ओमेगा -3, व्हिटामिन ई आणि झिंक यांचा एक उत्तम स्रोत आहे. व्हिटामिन ई श्वसनाशी जोडलेल्या समस्या जसे की अस्थमा, कमजोर होणारी नजर, हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी एक चांगली भूमिका निभावते. याव्यतिरिक्त झिंक आपल्या इम्यून सिस्टिमसाठीही फायदेशीर ठरू शकतं.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटामिन ए, सी यांच्यासोबतच व्हिटामिन के, आयर्न आणि कॅल्शियम यांचे प्रमाण चांगले आढळते. थंडीत लोकांना संधिवाताचा त्रासही अधिक होतो. अशावेळी हिरव्या पालेभाज्यांमधील कॅल्शियम तुमच्या हाडांना मजबूती देऊ शकते.
या सर्वांव्यतिरिक्त हिवाळ्यामध्ये आल्यालाही तुम्ही तुमच्या आहाराचा हिस्सा बनवू शकता. आल्यामध्ये अँटिइंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडंटस गुणही असतात. जे तुमची रोगप्रतिकारकशक्ती बूस्ट करण्यासोबतच सर्दी-खोकला, ताप, बद्धकोष्ठता, अपचन या समस्यांपासूनही आराम देतात.
हेही वाचा : Winter travel tips – थंडीत प्रवास करताना घ्या ही काळजी
संपादन- तन्वी गुंडये