35-40 हजारांची गर्दी, साडेपाचची सभा,मुसळधार पाऊस अन्... मराठी अभिनेत्याने सांगितला शरद पवारांच्या 'साताऱ्यातील' सभेचा किस्सा
अपूर्वा जाधव November 17, 2024 10:43 AM

Sharad Pawar : महाराष्ट्राच्या 2019च्या निवडणुकांमध्ये साताऱ्यात शरद पवारांच्या (Sharad Pawar) एका सभेने पुढच्या पाच वर्षांची राजकीय गणितच बदलून टाकल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे शरद पवारांच्या सभेतील पाऊस हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. शुक्रवारी साताऱ्यातील रहिमतपूरमध्ये पार पडलेल्या सभेचीही पावसामुळे चर्चा झालीच, पण या सभेतील शरद पवारांचं भाषण विशेष गाजलं. याच सगळ्यावर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची पोस्ट सध्या चर्चेत आलेली आहे. 

रहिमतपूरमधील सभेमध्ये शरद पवारांना पावसामुळे पोहचता आलं नाही. पण या सभेत त्यांनी फोनवरुन भाषण केलं आणि जमलेल्या साऱ्यांनी ते भाषण ऐकलं. किरण माने यांनी हाच अनुभव त्यांच्या सोशळ मीडियावर शेअर केला आहे. प्रचाराच्या धामधुमीत शरद पवारांच्या प्रत्येक सभेनेच साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यातच रहिमतपूरची ही सभा मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलीये. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत साताऱ्याचीच सभा भाकरी फिरवणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

किरण माने यांनी सांगितला अनुभव

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'शरद पवार' या नावाची जादू'याची देही याची डोळा पाहिली'!रहिमतपूरला साहेबांच्या सभेला साधारणपणे पंधरा हजार लोक येतील असा अंदाज होता... पस्तीस ते चाळीस हजार लोक आले. साडेपाचची सभा होती. मुसळधार पाऊस सुरू झाला. खराब हवामानामुळे साहेबांचे हेलीकाॅप्टर येऊ शकले नाही. साहेब गडहिंग्लजवरुन 'बाय रोड' निघाले. लोक वाट पहात होते. साडेसहा झाले, सात वाजले, आठ वाजले, साडेआठ वाजले... लोक पावसात भिजले, पण जागचे हलत नव्हते. कुठल्याही गाडीचा आवाज आला की 'पवारसाहेब आले' असं समजून अख्खा पस्तीस चाळीस हजारांचा माॅब उठून उभा रहायचा. साहेब नाहीत असं कळाल्यावर निराश होऊन खाली बसायचा.

'कराड उत्तर मतदारसंघाचे निष्ठावान उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. "किरणजी, भुमीपुत्र म्हणून रहिमतपूरकरांचे तुमच्यावर खुप प्रेम आहे. तुमच्या भेटीचा आग्रह आहे. याच." असा फोन आमचे बंधु आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी केला. त्यामुळे आनंदानं गेलो. माझं भाषण सुरू असताना हे प्रेम मला स्पष्ट जाणवत होतं. अतिशय मनापास्नं संवाद साधला... 'या हृदयीचं त्या हृदयी पोचलं'. भ्रष्ट गद्दारांच्या मगरमिठीतनं हे राज्य सुटावं ही तळमळ प्रत्येकाच्या मनात आहे हे जाणवलं. ...आता आमच्यासकट सगळ्यांच्या नजरा पवारसाहेबांच्या वाटेवर होत्या.'

'शेवटी वेळ संपत आली. साहेब रस्त्यातच होते. आता ते सभेला येऊ शकत नाहीत हे स्पष्ट झाले. साहेबांनी गाडीतुनच फोनवरून भाषण केलं. फोन माईकला लावून ते भाषण लोकांनी जीवाचा कान करून ऐकले... सर्वसामान्य जनमानसात साहेबांचा करीश्मा काय आहे ते सगळ्यांनी अनुभवलं ! पवारसाहेब, तुम्ही या वयात महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे कष्ट घेत आहात, ते हा मराठी मुलूख कायम लक्षात ठेवेल.' 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

ही बातमी वाचा : 

Girish Oak : मला पडलेले दोन भाबडे प्रश्न,एक पार्टी 1500 देतेय दुसरी 3000 देणार म्हणतेय पण..., गिरीश ओक यांची विचारात्मक पोस्ट चर्चेत

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.