“…नाहीतर हुतात्मा स्मारकाच्या भूखंडावरही अदानीचा टॉवर उभा राहील”, संजय राऊतांचा हल्लाबोल
GH News November 17, 2024 11:10 AM

Sanjay Raut Rokhthok : महाराष्ट्रातील सरकार अदानी यांच्यावर विशेष मेहेरबानी दाखवत आहे, कारण अदानी यांच्याकडे मोदी यांची दौलत आहे. पण महाराष्ट्र म्हणजे मोदी-शहांची दौलत नाही. अदानीचा पराभव हाच शिंदे-फडणवीस-शहा-मोदींचा पराभव; तो करायलाच हवा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकावर मोठा घणाघात केला. “महाराष्ट्राची लढाई ही आता सरळ सरळ गौतम अदानी व त्यांच्या पैशांच्या साम्राज्याविरुद्ध आहे. मुंबई त्यांना संपूर्णपणे गिळायची आहे व त्याची तयारी पूर्ण झाली आहे. फोर्ट भागात संयुक्त महाराष्ट्रातील 106 हुतात्म्यांचे स्मारक आज आहे. हा मोक्याचा भूखंडही उद्या अदानी ताब्यात घेतील व उद्या त्या स्मारकावर अदानींचा टॉवर उभा राहिलेला दिसेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आता लोकांना माहीत नाही. अदानी त्यांच्यापेक्षा मोठे. एका मोकळ्या भूखंडावर अदानीचा टॉवर उभा राहील. पहा, विकास झाला असे म्हणत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे जाहिराती करतील! मराठी माणसा, हे तुझ्या डोळ्यांदेखत घडू द्यायचे काय? अदानीचा पराभव हाच शिंदे-फडणवीस-शहा-मोदींचा पराभव; तो करायलाच हवा”, असे संजय राऊत म्हणाले.

रोखठोक सदरात नेमकं काय?

“महाराष्ट्र निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. हा लेख लिहीत असताना शिंदे गटाचे दिल्लीतील नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रात येऊन जाहीर केले की, आजच्या निवडणुका आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहोत, पण निकालानंतर नेता कोण हे आम्ही एकत्र बसून ठरवू. याचा अर्थ स्पष्ट आहे, शिंदे यांचा कार्यकाळ अमित शहा यांनी संपवला आहे. अमित शहा आता फडणवीस यांना मुख्यमंत्री करायला निघाले आहेत, पण महाराष्ट्राची जनता फडणवीस यांची सावलीही स्वीकारायला तयार नाही”, अशा शब्दात संजय राऊत यांनी घणाघात केला.

“मोदी-शहा-फडणवीस व गौतम अदानी हा या निवडणुकीतला ज्वलंत विषय आहे. महाराष्ट्राचे मराठीपण टिकवायचे असेल तर हे राज्य मोदी-शहा-फडणवीसांच्या हाती जाता कामा नये. मुंबईतील सर्व मोक्याच्या जमिनींचा ताबा अदानी यांना देण्यात आला. मिठागरे, जकात नाके अशा जागांवर अदानी यांनी आताच खुंट्या ठोकल्या. नवी मुंबईत सातारा-पाटण रहिवाशांच्या मेळाव्यात गेलो. तेथील रहिवाशांनी माहिती दिली, ”अदानी आता साताऱ्यातही घुसले.” महाराष्ट्रातील सरकार अदानी यांच्यावर विशेष मेहेरबानी दाखवत आहे, कारण अदानी यांच्याकडे मोदी यांची दौलत आहे”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

नवाब मलिकांवरही टीका

“ठाकरे मुख्यमंत्री असताना नवाब मलिक व दाऊद संबंधाचे एक प्रकरण फडणवीस – शिंदे वगैरे लोकांनी उकरून काढले. नवाब मलिक यांचा राजीनामा घ्या, नाहीतर हे सरकार दाऊद समर्पित आहे असे मानू, ही गर्जना फडणवीस करीत राहिले. नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसायचे नव्हते म्हणून सरकार पाडले व सुरतला पळालो, असे तेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले. आज तेच दाऊद समर्पित मलिक महायुतीमध्ये आहेत व विधानसभेचे उमेदवारदेखील झाले”, अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केला.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.