Tu hi re Maza Mitva Serial: सध्या टीआरपीच्या रेसमध्ये आपल्या चॅनलचे स्थान अव्वल ठेवण्यासाठी छोट्या पडद्यावर नव्या मालिकांचा धडाका सुरू झालाय. सध्या स्टार प्रवाह वर नव्या मालिकांची रांग लागल्याचं दिसतंय. काही दिवसांपूर्वी 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेची घोषणा झाली. त्यानंतर 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेचे प्रोमोही येण्यास सुरुवात झाली. आता या वाहिनीवर आणखी एक मालिका दाखल होणार आहे. नुकतीच या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
तू ही रे माझा मितवा या नव्या मालिकेचा प्रोमो सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. स्टार प्रवाह वर अभिनेत्री शर्वरी जोग आणि अभिनेता अभिजीत आमकर यांचा प्रमुख भूमिका असणारी ही मालिका 23 डिसेंबर पासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तू ही रे माझा मितवा या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे. यात ईश्वरी देसाई ही मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी फॅशन इंडस्ट्रीत दाखल झाली आहे. ऑफिसच्या पहिल्या दिवशी उशीर झाल्याने गोंधळलेली ईश्वरी आणि मालिकेच्या हिरोचं पात्र साकारणारा अभिजीत आमकर हा खडूस बॉसच्या भूमिकेत दिसत आहे. हातावरची जखम दाखवत उशीर झाल्याचं कारण सांगितल्यानंतर जखम दाखवत अशा रंगाचा ब्लड रेड रंग ड्रेस साठी हवाय असं तो त्याच्या कर्मचाऱ्यांना सांगताना दिसतोय. या प्रोमोवर चहात्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी ही मालिका हिंदीतील 'इस प्यार को क्या नाम दु' या सिरीयलचा रिमेक असल्याचं लिहिलंय.
View this post on Instagram
शर्वरीने यापूर्वी स्टार प्रवाह वरील कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. आता या मालिकेनंतर तिचं पुनरागमन होणार आहे. शर्वरी आणि अभिजीत या दोघांची जोडी या प्रोमोमध्ये दिसत असून ही जोडी फ्रेश असल्याचं प्रेक्षक सांगतात. 23 डिसेंबर पासून तू ही रे माझा मितवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता नवीन मालिका सुरू होणार म्हटल्यावर अबोली मालिकेची वेळ बदलणार की मालिका संपणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष आहे.
काही महिन्यांपूर्वी स्टार प्रवाहच्या गणपती महोत्सवात अनेक नव्या कलाकारांची उपस्थिती होती. या महोत्सवात अभिजीत अनुकरणी शर्वरी जोग यांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे या दोघांची कोणती नवीन मालिका येणार अशी चर्चा सुरू होती. आता या दोघांची बहुप्रतिक्षित मालिका तू ही रे माझा मितवा.. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.