भारतीय संघाची अवघड परीक्षा
esakal November 17, 2024 11:45 AM

कसोटी सामन्यांची मालिका खेळायला ऑस्ट्रेलियात जाणं म्हणजे कोणत्याही पाहुण्या संघासाठी ती सर्वांत मोठी परीक्षा असते. खेळाच्या तंत्र कौशल्याबरोबर तुमच्या मानसिक कणखरतेचीही कठोर परीक्षा ऑसी खेळाडू आणि त्यांचे नाठाळ प्रेक्षक बघतात, हे सर्वांत मोठं आव्हान खेळाडूंना सर्वोत्तम खेळ सादर करायला प्रोत्साहित करतं.

तसं बघायला गेलं, तर ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियन संघाला पूर्वीच्या काळी वेस्ट इंडीज संघ तुल्यबळ लढत द्यायचा. मधूनच अॅशेस मालिकेत खेळताना इंग्लंडचा संघ माफक यश कमवायचा. पण गेल्या दोन दशकांत खरे दोन हात भारतीय संघानंच केले आहेत. भारताचा एकच संघ असा आहे, की ज्यांनी २००४ मधल्या दौऱ्यापासून ऑसी संघाच्या डोळ्यात डोळे घालून कडवा मुकाबला केला आहे.

गेल्या दोन दौऱ्यांत भारतीय संघानं चक्क ऑसी संघाला कसोटी मालिकेत पराभूत करायचा पराक्रम करून दाखवला आहे. पण तो झाला इतिहास. आता नवीन मालिकेत ऑसी संघ वचपा काढायला सगळी तयारी करून मैदानात उतरणार असताना भारतीय संघाच्या मनोबलावर गेल्या काही सामन्यांतील खराब खेळाचे ओरखाडे आहेत.

याच कारणानं पाच कसोटी सामन्यांची मालिका लक्षणीय ठरणार आहे. भारतीय संघ पराभवाचं दुःख मागं सारून पॅट कमिन्सच्या समतोल संघाला कशी लढत देतो हे बघणे क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

भारतीय संघ १९४७ पासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जात आला आहे. त्यात फक्त नऊ कसोटी सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्यातील चार कसोटी सामने गेल्या दोन मालिकेत जिंकले आहेत. म्हणजेच बाकीच्या सर्व प्रयत्नात फक्त पाच कसोटी विजय भारताच्या हाती लागले आहेत.

१९७७ मध्ये केलेल्या दौऱ्यात भागवत चंद्रशेखरच्या अफलातून गोलंदाजीमुळे भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिला विजय नोंदवता आला होता. नंतरचे चार विजय एक एक लक्षात येतात कारण दौऱ्यावर जाऊन ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा आनंद वेगळा असतो.

सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि लक्ष्मण कुंबळेच्या बलाढ्य भारतीय संघाला एक एक कसोटी सामना जिंकताना सर्वस्व पणाला लावावं लागलं होतं. म्हणूनच अॅडलेड आणि पर्थचे कसोटी विजय स्मरणात राहिले आहेत.

गेल्या दोन दौऱ्यांत भारतीय संघानं कमाल केली. ज्याला सांघिक कामगिरी कारण ठरली. तरीही चेतेश्वर पुजाराची संयमी फलंदाजी प्रचंड मोठे काम करून गेली होती, हे विसरता येणार नाही. २०१८-१९ आणि २०२१-२२ च्या दोनही दौऱ्यांत चेतेश्वर पुजारा ऑसी संघासाठी कबाब में हड्डी बनला होता. चार कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियन संघात पॅट कमिन्स, जोश हेझलवुड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन असे चारच गोलंदाज खेळले होते.

एकट्या पुजाराने चार कसोटी सामन्यांत जवळपास एक हजार चेंडू स्वत: खेळून चारही ऑसी गोलंदाजांची पुरती दमछाक केली होती. त्याच पुजाराने निभावलेली भूमिका चालू होणाऱ्या दौऱ्यात कोण अदा करणार हा यक्षप्रश्न आहे. कारण त्याच्या संयमी फलंदाजीचा मोठा परिणाम कसोटी मालिकेच्या निकालावर झाला होता.

ऑस्ट्रेलियन दौऱ्यात कसोटी मालिकेत चांगली सुरुवात करायची असेल, तर पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी करणे क्रमप्राप्त ठरते. प्रश्न आहे की कोण पेलणार हे शिवधनुष्य? कधी नव्हे इतकी भारतीय फलंदाजी चाचपडणारी वाटत आहे. यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत दोघेच चांगल्या लयीत सातत्याने फलंदाजी करताना दिसले आहेत. थोडी चमक शुभमन गिलने दाखवली. बाकी विराट कोहली, रोहित शर्मा, के एल राहुल आणि सर्फराझ खान सगळेच अडखळताना बघायला मिळाले.

पर्थच्या तेज खेळपट्टीवर कमिन्स - हेझलवुड - स्टार्कच्या ताज्यातवान्या आणि वेगवान त्रिकुटाला यशापासून लांब ठेवायला भक्कम फलंदाजी करावी लागणार आहे. नुसती आक्रमणाची भाषा बोलून फलंदाजी होणार नाही हे माहीत असताना खेळपट्टीवर ठाण मांडून फलंदाजी करायची क्षमता कोण दाखवणार हे बघायला मजा येणार आहे.

गेल्या दोन मालिकेतील पराभव ऑस्ट्रेलियन संघाच्या मनात जखम करून गेला आहे. फक्त भारतीय संघानेच आपल्याला त्रास दिल्याची भावना खुनशी ऑसी खेळाडूंच्या मनात घर करून आहे. परिणामी पॅट कमिन्सचा संघ भारतीय संघाला नेस्तनाबूत करायला सगळी तयारी करून बसला आहे. अत्यंत योजनाबद्ध प्रकारे ऑसी खेळाडूंना योग्य सरावासोबत भरपूर विश्रांती देण्यात आली आहे.

प्रमुख चार गोलंदाजांना क्रिकेटपासून लांब ठेवून ताजे ठेवले गेले आहेत. विकेटकीपर अलेक्स केरी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणार म्हणजेच ऑस्ट्रेलियाची फलंदाजी खोल आहे. बुमरा वगळता सिराज आणि आकाशदीपला ऑस्ट्रेलियन संघाला धक्के द्यायला खूप अचूक मारा सातत्याने करावा लागणार आहे. एकंदरीत खूप मोठे आव्हान भारतीय संघासमोर उभे ठाकले आहे.

एक नक्की वाटते, की दोनही संघांतील बऱ्याच खेळाडूंसाठी ही मालिका लक्षणीय असेल कारण बरेच खेळाडू एकमेकांसमोर शेवटच्या लढती खेळत असणार. ऑस्ट्रेलियन संघातील स्टीव्ह स्मिथ, हेझलवुड स्टार्क आणि लायन आपापल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि अश्विन परत ऑस्ट्रेलियाचा कसोटी दौरा करणार नाहीत. याचाच अर्थ स्पष्ट आहे, की मोजक्या परंतु मोठ्या खेळाडूंसाठी पाच कसोटी सामन्यांची लढत वेगळे महत्त्व दाखवणारी असेल.

अत्यंत विचारपूर्वक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या जागा निवडल्या आहेत. पर्थची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी आहे तर अॅडलेडला होणारा दुसरा कसोटी सामना दिवस-रात्रीचा असणार आहे. याच कसोटी सामन्यात भारताची पिंक चेंडूने दाणादाण उडवली होती.

म्हणजेच पहिल्या दोन कसोटी सामन्यांत पाहुण्या संघाला अडचणीत आणून मालिकेत आघाडी घेण्याचा अगदी अपेक्षित घाट क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातला आहे. कागदावर तगडी दिसणारी ही योजना उधळून लावायला खूप मोठी पराक्रमी कामगिरी भारतीय संघाला करावी लागणार आहे.

गेल्या काही सामन्यातील कुचकामी खेळाने भारतीय संघाकडून फार मोठ्या अपेक्षा क्रिकेट रसिकांच्या नाहीत ही एका अर्थाने चांगली गोष्ट मानली जाईल. घोडामैदान आता लांब नाही कारण शुक्रवारी २२ नोव्हेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे. पर्थ कसोटीत भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये आपला गेलेला तोल कसा सावरतो हे बघायला भारतातील क्रिकेट रसिक पहाटेचा गजर लावून उठून सामना बघायला टीव्ही समोर ठाण मांडणार आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.