Vidhan Sabha Elections 2024 : शिवसेना भवनमध्येच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ‘वॉर रूम’ आहे. पक्षाच्या प्रचार यंत्रणेची तांत्रिक बाजू सांभाळणारा चमू तेथे बसतो. मात्र शिवसेनेचे अडीच लाखापेक्षा अधिक शिवसैनिक हे शिवसेनेची भूमिका घराघरांत घेऊन जाण्याचे दरदिवशी काम करत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही तीच यंत्रणा होती आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातही तीच यंत्रणा असल्याचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान अभिमानाने सांगतात.
तांत्रिक वापर जास्त
निवडणुकांमध्ये प्रचार करण्याची पद्धत बदलली आहे, लोकांशी संपर्क साधण्यासाठीची माध्यमे बदलली आहेत. अशा काळातही शिवसेना पारंपरिक पद्धतीने निवडणुकीची प्रचार यंत्रणा राबवते आहे. ‘शिवसेनेच्या भूमिकेवर विश्वास असणारे शिवसैनिक असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पूर्वी सायकलवर जाऊन किंवा दूरध्वनीवरुन संपर्क साधावा लागत होता.
आता व्हॉट्सअॅपच्या एका संदेशावर सर्वकाही होते. ‘वॉर रूम’चा चमू हा आमच्यासाठी तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी आहे. हा चमू ‘शिवसेना भवन’मध्येच बसतो. मात्र याचा इतर राजकीय पक्ष वापरत करतात त्याप्रमाणे आम्हाला करावा लागत नाही. आमचा ‘वॉर रूम’चा वापर फारच मर्यादित असल्याचे प्रधान सांगतात.
जनतेच्या मनाला भिडणाऱ्या जाहिराती
शिवसेनेच्या जाहिरातींपासून प्रचारगीतापर्यंतच्या प्रसिद्धीच्या सगळ्या गोष्टी आकर्षक असतात. काही वर्षांपूर्वी शिवसेनेची करून दाखवलं’ किंवा ‘मी शिवसेना’ ही ‘कॅच लाईन’ खूप गाजली होती. शिवसेनेचा याप्रकारचे काम कसे आणि कुठे चालते याची उत्सुकता अधिक होती. याविषयी बोलताना प्रधान म्हणाले, की ‘उद्धव ठाकरे यांना जाहिरात क्षेत्राचा अनुभव आहे. रंगसंगती आणि कल्पनाचित्र यांची खूप चांगल्या पद्धतीने मांडतात.
शिवसेनेच्या आतापर्यंतच्या गाजलेल्या जाहिराती या उद्धव ठाकरे आणि त्यांचे जाहिरात क्षेत्रातील त्यांचे मित्र यांनीच केलेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना एकच सांगणे असते जाहिरात किंवा आश्वासनांच्या बाबतीत जे पूर्ण करता येईल, असेच आश्वासन द्या. सत्य आहे तेच बोला. उगीच खोट्या जाहिराती करू नका. त्यामुळेच आमच्या जाहिराती या लोकांच्या मनाला भिडणाऱ्या असतात, कारण त्यात सच्चेपणा असतो अशी पुस्तीही प्रधानांनी जोडली.
सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी युवासेनेचा खूप उपयोग ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला होतो. शिवसेनेच्या विचारांचे हे तरुण खूप सर्जनशीलपणे या माध्यमांचा वापर करतात. त्यासाठी ठाकरे यांचा पक्ष कोणासाठीही एकही रुपया खर्च करत नसल्याचे प्रधान यांनी अभिमानाने सांगितले.
मार्गदर्शक ‘सामना’
शिवसेनेचे मुखपत्र असलेले ‘सामना’ हे दैनिक शिवसैनिकांसाठी मार्गदर्शक असते. ‘‘आमचे निम्मे काम ‘सामना’ करते. लाखो शिवसैनिकांच्या मोबाईलवर ‘सामना’चा अग्रलेख नेहमी सकाळी पोहोचतो. त्यामुळे पक्षाची कोणत्या विषयावर काय भूमिका आहे, याचे स्पष्ट मत शिवसैनिकांचे तयार झालेले असते. मुंबईत ५५ हजार गटप्रमुखांचे शिबिर होते. त्यावेळी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना सांगतात, तुम्ही खूप जास्त काम करू नका. फक्त तुमच्या आजूबाजूच्या अडीचशे कुटुंबाशी संपर्क ठेवा.’ शिवसैनिकांचे हेच जाळे आमचे ‘वॉरियर’ आहे,’’ असे प्रधान सांगतात
#ElectionWithSakal