आगीच्या 'या' अनेक दुर्घटनांमध्ये गेला असंख्य लहान बाळांचा जीव
BBC Marathi November 17, 2024 02:45 PM
Getty Images आग शॉर्ट सर्किटमुळे हॉस्पिटलमध्ये आग लागल्याचं सांगितलं जातं आहे.

उत्तर प्रदेशातील झाशीच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील नियोनेटल इंटेंसिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) मध्ये शुक्रवारी आग लागून 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला.

झाशीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) सुधा सिंह यांनी पत्रकारांना या घटनेची माहिती देताना सांगितलं की या घटनेत जखमी झालेल्या 16 नवजात बाळांवर उपचार करण्यात येत आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेचा तपास करण्यासाठी आयुक्त आणि पोलीस उपमहासंचालक (डीआयजी) यांच्या नेतृत्वाखालील दोन सदस्यांच्या तपास समितीची नियुक्ती केली आहे.

अलीकडच्या काळात हॉस्पिटलमध्ये आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेक नवजात बाळांना जीव गमावावा लागला आहे. प्रत्येक वेळेस घटना घडल्यानंतर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचे दावे करण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये हॉस्पिटलमध्ये आग लागण्याच्या आणि त्यामुळे अनेक बाळांना जीव गमवावा लागल्याच्या घटनांबद्दल जाणून घेऊया.

BBC

BBC दिल्ली, 25 मे 2024

25 मे 2024 ला दिल्लीतील विवेक विहारमधील एका हॉस्पिटलमध्ये आग लागल्यामुळे सात नवजात बाळांचा मृत्यू झाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे बेबी केअर हॉस्पिटल बेकायदेशीररीत्या सुरू होतं. या हॉस्पिटलमध्ये फक्त पाच बेड होते. मात्र प्रत्यक्षात 12 बाळांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आलं होतं.

दिल्ली अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की शॉर्ट सर्किट हे आगीमागचं कारण असू शकतं. मात्र हे हॉस्पिटल सुरू ठेवण्यास परवानगी दिल्याच्या मुद्द्याबद्दल सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला गेला होता.

BBC बेबी केअर न्यूबॉर्न हॉस्पिटल, विवेक विहार, दिल्ली

हे हॉस्पिटल एका निवासी भागाजवळच्या दाटीवाटीच्या जागेत एका व्यावसायिक इमारतीत सुरू होतं. याच इमारतीत एक बॅंक देखील होती. हॉस्पिटलची मागची बाजू निवासी कॉलनीशी जोडलेली होती.

पोलीस तपासात समोर आलं होतं की हॉस्पिटलमध्ये एमबीबीएस डॉक्टरांऐवजी बीएएमएस (आयुर्वेदीक) डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती.

तपासानुसार, हॉस्पिटलचा परवान्याची मुदत 31 मार्चलाच संपली होती. शिवाय हॉस्पिटलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होती. हे हॉस्पिटल दोन मजली होतं. या हॉस्पिटलमध्ये कोणताही आपत्कालीन दरवाजा नव्हता.

हॉस्पिटलला फक्त 20 सिलिंडर ठेवण्याची परवानगी होती. मात्र असं असतानाही या हॉस्पिटलमध्ये 32 सिलिंडर होते.

राजकोट गेम झोन अग्निकांड, 25 मे 2024

25 मे 2024 ला गुजरातमधील राजकोटमध्ये एका गेमझोनला भीषण आग लागल्याच्या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला होता. यात 9 मुलांचाही समावेश होता.

ही आग खूप भीषण होती. त्यामुळे त्यात मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करावी लागली होती.

मे महिना असल्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या. त्यामुळे मोठ्या संख्येनं मुलं त्यांच्या कुटुंबीयांबरोबर या गेमझोनमध्ये आले होते.

BBC / BIPIN TANKARIA आग प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे राजकोटमधील गेमझोनमध्ये देखील आग लागल्याचं समोर आलं होतं.

जकोट तालुका पोलिसांनी गेमझोनच्या व्यवस्थापकांसह सहा जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम 304, 308, 337, 338 आणि 114 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

प्राथमिक तपासातून गेमझोनमध्ये आगीसाठी सुरक्षा किंवा फायर सेफ्टी मध्ये बेजबाबदारपणा केल्याची बाब समोर आली होती.

6 ऑगस्ट 2020 ला अहमदाबादच्या नवरंगपुरा भागातील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये आग लागली होती. यात कोरोनाच्या आठ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

भोपाळ, नोव्हेंबर 2021

नोव्हेंबर 2021 मध्ये भोपाळमधील कमला नेहरू हॉस्पिटलच्या बालरुग्ण विभागात आग लागली होती. या आगीत चाल मुलांचा मृत्यू झाला होता, तर तीन मुलं भाजली गेली होती.

यासंदर्भात प्रशासनाचं म्हणणं होतं की सिलेंडरचा स्फोट किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी.

भोपाळमधील या आठ मजली हॉस्पिटलमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. या हॉस्पिटलमध्ये नेहमीच जवळपास 400 रुग्ण भरती असायचे.

SHURAIH NIAZI/BBC हमीदिया या भोपाळमधील सर्वात मोठ्या सरकारी हॉस्पिटलच्या परिसरात कमला नेहरू हॉस्पिटल आहे.

त्याचबरोबर ही बाब देखील समोर आली की या हॉस्पिटलकडे इमारतीची फायर एनओसी देखील नव्हती.

हॉस्पिटलने एनओसी घेतली नव्हती तसंच हॉस्पिटलचं फायर सेफ्टी ऑडिट देखील झालेलं नव्हतं.

त्याचबरोबर आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेली उपकरणं देखील नादुरुस्त होती.

महाराष्ट्र, जानेवारी 2021

9 जानेवारी 2021 ला महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील हॉस्पिटलमधील स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये आग लागली होती. या आगीत 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला होता.

एएनआय या वृत्तसंस्थेनं डॉक्टरांचा संदर्भ देत सांगितलं होतं की सर्व नवजात बाळं एक महिना ते तीन महिन्या दरम्यानची होती.

Pravin Mudholka मृत्यूमुखी पडलेल्या सर्व 10 नवजात बाळांचं वय एक महिना ते तीन महिन्यांदरम्यान होतं.

प्रशासनानं ही बाब मान्य केली होती की हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी उपकरण बसवण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षापासून प्रलंबित होता. अर्थात तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

राज्याचे तत्कालीन मंत्री विजय वडेट्टीवार त्यावेळेस, नागपूरच्या नॅशनल फायर सेफ्टी कॉलेज अॅंड विश्वेसरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या तज्ज्ञांकडून या प्रकरणाचा तपास करण्याबद्दल आणि दोषींना कडक शिक्षा देण्याबद्दल बोलले होते.

कोलकाता

डिसेंबर 2011 मध्ये कोलकातामधील एएमआरआय या एका खासगी हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. या भीषण आगीत किमान 89 जणांचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश जणांचा मृत्यू जीव गुदमरल्यामुळे झाला होता.

या घटनेच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये 160 रुग्ण होते. हॉस्पिटलमध्ये सर्वाधिक मृत्यू अशा लोकांचे झाले जे उपचार घेत होते.

BBC हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना शेवटी हॉस्पिटलमधून बाहेर काढण्यात आलं.

या घटनेबाबत सांगितलं जातं की ही आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना खिडकीची काच फोडावी लागली होती. त्यानंतरच ते रुग्णांना बाहेर काढू शकले.

याच वर्षी ऑक्टोबर महिन्यातच पश्चिम बंगालमधील सियालदहमध्ये ईएसआयई हॉस्पिटल मध्ये आग लागली होती. या आगीत एकाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली होती.

फायर सेफ्टी संदर्भात सूचना

याच वर्षी मे महिन्यात आग लागण्याच्या दोन मोठ्या घटना घडल्यानंतर जून महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी फायर सेफ्टीशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

मंत्रालयानं राज्यांना आगीला प्रतिबंध करणाऱ्या उपाययोजना लागू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यात ज्वलनशील पदार्थांची साठवणूक सुरक्षितरीत्या करणं आणि इलेक्ट्रिक सर्किटची नियमितपणे तपासणी करणं इत्यादी बाबींचा समावेश होता.

मंत्रालयानं या नियमांचं कठोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय सांगितलं होतं
  • फायर सेफ्टीच्या एनओसी साठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हॉस्पिटल आणि पीडब्ल्यूडी आणि स्थानिक अग्निशमन विभागामध्ये योग्य ताळमेळ साधण्यात यावा.
  • आवश्यक फायर सेफ्टी आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी उपाययोजनांना लागू करण्यात यावं. तसंच याची नियमितपणे चोख तपासणी केली जावी.
  • आग प्रतिबंधित करण्यासाठी नियमितपणे मॉक ड्रिल घेण्यात यावं. त्याचबरोबर फायर सेफ्टीच्या प्रोटोकॉलचं हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावं.
  • आगीला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक अशा अलार्म सिस्टमच्या देखभालीवर व्यवस्थित लक्ष देण्यात यावं.
  • सर्व हॉस्टिपटलमधील उपाययोजना, आग प्रतिबंधक व्यवस्थेचा आढावा घेण्यात यावा आणि ऍम्ब्युलन्सच्या उपलब्धतेची खातरजमा करण्यात यावी.
  • सर्व हॉस्पिटलमध्ये सर्व आवश्यक नियमांचं पालन होत असण्यावर तसंच आग प्रतिबंधक उपाययोजना, मदत कार्य यांच्या तयारीवर विशेष लक्ष देण्यात यावं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.