हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
जयदीप भगत, बारामती November 17, 2024 05:13 PM

Supriya Sule on Dattamama Bharne : इंदापूर विधानसभा मतदारसंघातून (Indapur Vidhansabha) हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केला. ही सीट निवडून आल्यात जमा आहे. आमच्याकडे तपशील असल्याचे त्या म्हणाल्या. आता प्रश्न एवढाच आहे की, दत्तामामाला किती हजार मतांनी पाडायचे हे तुम्ही सर्वांनी ठरवा असेही सुळे म्हणाल्या. मालाला घरी पाठवण्यासाठी तुम्ही ताकदीने काम करा असेही सुळे म्हणाल्या. 

गद्दारी करणाऱ्यांना इंदापूरची जनता माफ करणार नाही

गद्दार या शब्दाला महाराष्ट्राने कधी माफ केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दारांचे हात कापण्याचे देखील आदेश दिले होते असे सुळे म्हणाल्या. मराठी माणसाला फसवलेलं, गद्दारी केलेली आवडत नाही. पवार साहेबांना फसवण्याचं, गद्दारी करण्याच काम ज्यांनी केलं त्यांना महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात शिक्षा होणार असल्याचे सुळे म्हणाल्या. पवार साहेबांनी तुम्हाला काय नाही दिलं? आमदारकी मिळाली, मंत्रीपद मिळालं, प्राधान्य तुम्हाला सतत दिलं. 11-12 मंत्री घ्यायचे असले तरी पवारसाहेबांनी यांना मंत्री ठेवण्याचे काम सतत केले. आज त्याच पवारसाहेबांना सोडून लोक गेले. गेली ते गेले बाकीचे आवाज तर काढत नाहीत पण ह्यो तुमचा बाबा लय आवाज काढायला लागलाय. गप्प तरी बरावं की नाय जाऊन. गेल्यानंतर एवढा उर्मटपणा आणि पवार साहेबांना चँलेंज करणं? इंदापूरची जनता माफ करणार नाही. असे म्हणत सुप्रिया सुळेंनी दत्तात्रय भरणे यांच्यावर टीका केली. 

इथं एक बाळ उभा, सुळेंचा प्रविण मानेंना टोला

अनेकजण या मतदार संघात इच्छुक होते. त्यांना घेऊन गेलो असतो तर पोहोचलो नसतो. एक बाळ उभा आहे इथे, काय गरज होती का ? असे म्हणत सुळेंनी प्रविण मानेंना टोला लगावला. घड्याळ चोरीला गेले आहे. त्यांना चिन्ह मिळालयं. पण त्याखाली लिहायला लावलंय कोर्टाने की हे न्यायप्रविष्ठ आहे म्हणून. आता निवडणूक आयोगाकडे तक्रार जाईल. कोर्टाचा अवमान केला आहे असे सुळे म्हणाल्या. 

राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार 

रायगडावर जाऊन शिवरायांच्या पायाशी तुतारी अर्पन करुन सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात जनतेने प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पाच टीएमसी पाण्याचा सर्वे करायची आँर्डर मीच दिली होती. केवळ सर्वेला मंजूरी दिली होती. पाणी मंजूर केले नाही. सर्वे मी करायची आँर्डर दिली होती. श्रेय घेण्याच कारण नाही. कारण त्याचं श्रेय शरद पवारांना पर्यायाने हर्षवर्धन पाटलांना जातं असेही सुळे म्हणाल्या. पुढे या पाण्याची योजना होईल त्याचं उद्घाटन आमदार म्हणून हर्षवर्धन पाटीलच करतील असा मी शब्द देते असेही सुळे म्हणाल्या. उद्या राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार मी खात्री देते असेही त्या म्हणाल्या, .

महाराष्ट्रातील त्रिकुट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही

महाराष्ट्र महागाईने होरपळत आहे. उद्योग बाहेर जात होते, तेव्हा या त्रिकुटांनी तोंडातून भ्र शब्द काढला नाही.अमित शाह यांना हे प्रचंड घाबरतात असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आज महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात दुसऱ्या तिसऱ्या स्थानी होतो. आज आपला 11 नंबर आहे असे सुळे म्हणाल्या. त्यामुळं महाराष्ट्रातील त्रिकुट घरी गेल्याशिवाय महाराष्ट्र सुधारणार नाही असा टोलाही सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लगावला. 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.