काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हे प्रकरण वाढलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांकडून रोड शो वेगानं पुढं नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पोलिसांची अपेक्षा अशी होती की संध्याकाळ होण्यापूर्वी रोड शो गतीनं निघून जावा. पोलिसांनी धिम्या गतीनं चालणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना वेगानं पुढं जाण्यास सांगितलं असता काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. एसीपी अनिता मोरे यांच्यासोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुज्जत घालत वाद घातला. रोडशो अपेक्षित गतीने पुढे जात नाही म्हणून अनिता मोरे आणि इतर पोलीस अधिकारी रस्त्यात थांबून घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे ढकलत होते. तेव्हा काँग्रेसचे अनेक पुरुष कार्यकर्ते चिडले आणि अनिता मोरे इतर पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारु लागले. यामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचं पाहायला मिळालं.