छत्रपती संभाजीनगर : निवडणुकीच्या कामात प्रचारासाठी मिळणारे पैसे तुलनेत कमी असल्याने रोजंदारी मजुरांचा ओढा ‘आधी नियमित काम, नंतर काम नसेल तर निवडणुकीचे काम’ असा असल्याचेच दिसून येत आहे.
शहरातील कामगार चौक, पीरबाजार, रेल्वेस्टेशन आणि शहागंज यासह विविध ठिकाणी रोज शेकडो मजूर कामाच्या प्रतीक्षेत जमा होतात. मातीकाम, खोदकाम आणि सेंट्रिंगची कामे करणारे हे मजूर असतात.
त्यांना सातशे ते एक हजार रुपये दराने काम मिळते. सकाळी ७ ते १२ यावेळेत हे सर्व मजूर अड्ड्यावर कामाच्या प्रतीक्षेत असलेले मजुरांचे जत्थे पाहायला मिळतात. निवडणूक काळात प्रचार फेऱ्या, पदयात्रा आणि जाहीर सभांसाठी गर्दीचा भाग म्हणून या मजुरांना काम मिळते.
बऱ्याचदा काम नसल्याने, मिळेल त्या मजुरीत काम कारावे लागते. काम न मिळाल्याने दुपारी चारनंतर काही मजूर केटरिंगच्या कामासाठी जातात.
आम्हाला हजार ते बाराशे रुपये रोज मिळतो. कामगारांना रोजच काम मिळेल असे नाही. हजार रुपयाचे काम सोडून आम्ही प्रचार रॅलीत जाणे टाळतो. महागाईचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात घरभाडे आणि इतर खर्चही मोठा आहे.
प्रचार रॅलीत मोजके लोकच पैशांच्या लालसेपोटी जातात. यात उमेदवाराच्या प्रचारासाठी कमी पैसे मिळतात. त्यामुळे येथील मजूर प्रथम कामाला प्राधान्य देतात.
- सोमनाथ खिल्लारे, बांधकाम मजूर, पीरबाजार
#electionwithsakal