विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशामध्ये काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यावर खळबळजनक आरोप केला आहे. 'राष्ट्रवादीचे नेते मला ब्लॅकमेल करत आहेत. २५ लाखांची मागणी करत आहेत.', असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेसचे गटाचे प्रदेश सरचिटणीस सुनील वऱ्हाडे यांनी मला २५ लाख रुपयांची मागणी करत ब्लॅकमेल केलं.', असा खळबळजनक आरोप नेत्या आणि तिवसा मतदार संघाच्या मविआच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांनी केला. 'सुनील वऱ्हाडे हे स्वतः च्या फायद्यासाठी सगळं करतात. पक्षाच्या हिताचे काम सुनील वऱ्हाडे करत नाही. ते व्यापारी आहे त्यामुळे मला ब्लँकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत.' असा धक्कादायक आरोप यशोमचे ठाकूर यांनी केला आहे.
'२५ लाख रुपये द्या मी प्रचार करणार नाही. दवाखान्यात एडमिट होतो.', असं सुनील वऱ्हाडे यांनी म्हटले असल्याचा दावा यशोमती ठाकूर यांनी केला. तर यशोमती ठाकूर यांचे सर्व आरोप सुनील वऱ्हाडे यांनी फेटाळून लावले. 'मी यशोमती ठाकूर यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आणि मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.', अशी प्रतिक्रिया सुनील वऱ्हाडे यांनी दिली. या घटनेमुळे विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी मधील महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.