नाका मजूर उपेक्षितच
जाहीरनाम्यातून सर्वच उमेदवारांनी केले बेदखल
राजीव डाके : सकाळ वृत्त सेवा
ठाणे शहर, ता. १७ : विधानसभेची निवडणूक लढवित असलेल्या सर्वच पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना नाका मजुरांचा विसर पडलेला दिसतो आहे. ठाण्यातील चारही मतदारसंघात या मजुरांचे १९ नाके आहेत; मात्र तिथे कोणत्याही सुविधा देण्याचा उल्लेख उमेदवारांच्या जाहीरनाम्यांतून दिसून येत नाही. आजही रोज हजारोंच्या संख्येने कोणत्याही सुविधेविना मजुरांना नाक्यांवर उभे राहावे लागत आहे.
विधानसभेची निवडणूक लढत असलेल्या सर्वच उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आमदार म्हणून काम करत असलेल्या उमेदवारांनी जाहीर केलेल्या त्यांच्या जाहीरनाम्यातून मतदारसंघात केलेल्या कामांचा सचित्र लेखाजोखा मांडला आहे, तसेच पुन्हा निवडून येण्यासाठी भरघोस कामे करण्याची आश्वासने दिली आहेत; मात्र त्यांच्याच मतदारसंघात असलेल्या गरीब मजुरांच्या नाक्यांना बेदखल केले आहे. आपापल्या मतदारसंघात असलेल्या या कष्टकऱ्यांना कोणत्या सुविधा देणार याबद्दल चकार शब्दही सांगण्यात आला नाही. ठाण्यात १९ हून अधिक मजुरांचे नाके आहेत. या ठिकाणी रोज सकाळी हजारोंच्या संख्येने ते कामासाठी उभे राहतात. रोज काम मिळेलच अशी कोणतीच शाश्वती नाही; पण तरीही काहीजण काम मिळेल या आशेने दिवसभर येथे उभे असतात. त्यांना थंडी, ऊन, पावसाचा मारा सहन करावा लागतो. यापासून संरक्षण मिळावे, अशी कोणतीही सुविधा या नाक्यांवर नाही. कोणत्याही लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, अनेक ठिकाणी शौचालये नाहीत, बसण्याची सुविधा नाही, शेड नाहीत असे असतानाही एकाही उमेदवाराकडून या सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांच्या जाहीरनाम्यातून देण्यात आलेले नाही. त्यामुळे आम्ही मजूर सरकारचे लाडके नाहीत का, असा सवाल या मजुरांना पडला आहे.
दोन-चार मिनिटे बसची वाट पाहत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांसाठी बस थांब्यावर बसण्याची, सावलीची सुविधा आहे; पण दिवसभर कामाच्या शोधात नाक्यांवर उभ्या असलेल्या मजुराला कोणतीच सुविधा नाही. एकाही उमेदवाराकडून या वर्गाची दखल घेतली नाही. कष्टावर जगणाऱ्या मजुराला असे बेदखल करणे कोणालाच शोभानीय नाही. सर्व नाक्यांवर स्वच्छ पाणी, शौचालये, हिरक्षणी कक्ष, बसण्याच्या सुविधेसोबतच महत्त्वाच्या नाक्यांच्या ठिकाणी रोजगार सेंटर सुरू करायला हवीत.
- जगदीश खैरालिया, महासचिव, श्रमिक जनता संघ
निवडणुकीत उमेदवारांचे प्रतिनिधी नाक्यांवर येतात आणि प्रचारासाठी अर्ध्या रोजंदारीच्या बोलीवर मजुरांना सभा, रॅली, प्रचारासाठी घेऊन जातात, पण आजवर कोणताही लोकप्रतिनिधी आमची रोजची व्यथा समजून घेण्यासाठी नाक्यावर आला नाही. काम मिळेल या आशेने घरातून उपाशी निघतो. काम मिळाले नाही तर चहा पिण्यासाठीदेखील खिशात पैसा नसतो. अनेकांना सरकार सुविधा देते, पण त्यात आम्ही कुठेच नसतो.
- नाका मजूर, कापूरबावडी
कुणाच्या मतदारसंघात किती मजूर नाके
प्रताप सरनाईक : आनंद नगर, कासारवडवली, शास्त्री नगर, टिकूनजिनीवाडी, हरिनिवास, भाईंदर (नया नगर)
संजय केळकर : जांभळी नाका, कापूरबावडी, मानपाडा, कशेळी
डॉ. जितेंद्र आव्हाड : कळवा, मुंब्रा, कौसा, शिळफाटा
एकनाथ शिंदे : इंदिरा नगर, गांधी नगर, कोपरी, किसन नगर, लोकमान्य नगर.