Airoli Vidhan Sabha Election 2024 : ऐरोली विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे. 2009 आणि 2014 मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. पण, 2019 मध्ये इथे भाजपने सत्ता काबीज केली. भाजपने सलग दुसऱ्यांदा गणेश नाईक यांना तिकिट दिलं आहे. सलग दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले गणेश नाईक यांना आता गड कायम राखण्याचं आव्हान आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात भाजपचे गणेश नाईक विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे एम.के.मढवी अशा लढत पाहायला मिळणार आहे. यासोबत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम आणि अपक्ष उमेदवार विजय चौगुले हे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातून 2009 आणि 2014 मध्ये संदीप गणेश नाईक यांना जनतेने विजयी केलं होतं. दोन्ही वेळा संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. संदीप नाईक यांनी शिवसेना उमेदवार विजय चौघुले यांचा पराभव केला होता. पण, 2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघात भाजपने बाजी मारली होती. भाजपचे उमेदवार गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
ऐरोली मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात येतो. कळवा आणि ठाणे जवळच्या असलेल्या या मतदारसंघात दलित, मुस्लिम, पाटील आणि यादव या मतदारवर्ग मोठा आहे. 2019च्या आकडेवारीनुसार, ऐरोली मतदारसंघात एकूण 4 लाख 47 हजार 697 मतदार आहेत. यातील 42 हजार 531 दलित, 26 हजार 861 मुस्लिम, 17 हजाराहून अधिक पाटील आणि साडेबारा हजार यादव मतदार आहेत. त्याशिवाय 9 हजाराच्या आसपास राजपूत आणि 8 हजाराच्या जवळपास आदिवासी मतदार आहेत.