सिंदखेड राजामध्ये महायुतीत मैत्रिपूर्ण लढत तर राजेंद्र शिंगणेंविरोधात गायत्री शिंगणेंची बंडखोरी, कोण मारणार बाजी?
जयदीप मेढे November 18, 2024 02:43 AM

Sindhkhed Raja Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी असे अनेक राजकीय पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातही अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. 

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. कारण शिंदेंच्या शिवसेनेकडून शशिकांत खेडेकर  यांना उमेदवार देण्यात आली आहे, तर अजित पवारांनी मनोज कायंदे यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीकडूनच दोन उमेदवार मैदानात आहेत. 

महाविकास आघाडीकडून सिंधखेड राजाची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे. शरद पवारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर घरवापसी केलेल्या राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी दिली आहे. तर निष्ठा ठेऊन सोबत राहणाऱ्या गायत्री शिंगणे यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली होती. राजेंद्र शिंगणे उमेदवारी मिळवण्याठी एका कारमध्ये फाईलमागे तोंड लपवून शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांना साथ देणारे शिंगणे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडे परतले होते. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर पतलेल्या राजेंद्र शिंगणेंना उमेदवारी दिल्यानंतर गायत्री शिंगणे संतापल्या होत्या. त्यांनी थेट बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

दरम्यान, अजित पवारांसोबत गेलेल्या शिंगणेंनी वारंवार शरद पवारांचे कौतुक केले होते."मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे आणि नाइलाजाने मी अजित दादांसोबत गेलो. आज राज्य सहकारी बँकेला राज्य सरकारने तीनशे कोटी दिले आहेत. परंतु निश्चितपणे आदरणीय शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहील", असं शिंगणे म्हणाले होते. 

सिंदखेड राजामध्ये कोण कोण रिंगणात? 

डॉ.राजेंद्र शिंगणे ( राष्ट्रवादी श प ),  शशिकांत खेडेकर ( शिवसेना शिंदे ) ,  मनोज कायंदे  (अजित पवार राष्ट्रवादी) , विरुद्ध गायत्री शिंगणे ( बंडखोर श.प. राष्ट्रवादी )

2019 मध्ये काय झालं?

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांनी शिवसेनेच्या शशिकांत खेडेकर यांचा तब्बल 10 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांना 81,701 मते पडली होती. तर शिवसेनेच्या शशिकांत खेडेकर यांना 72 हजार 763 मते मिळाली होती.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.