Kalwa Mumbra Assembly Election 2024 : येत्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्षांकडून प्रचारासाठी शेवटचा जोर मारला जात आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळत आहे. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात महायुतीने राष्ट्र्वादी काँग्रेसकडून नजीब मुल्ला यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा गड मानला जातो. जितेंद्र आव्हाड यांनी 2009 पासून हा मतदारसंघ काबीज केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीने नजीब मुल्ला यांना तिकीट दिलं आहे.
महाविकास आघाडीने कळवा-मुंब्रा मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडला आहे. या मतदारसंघात जितेंद्र आव्हाडांना सलग चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. जितेंद्र आव्हांडाच्या विरोधात महायुतीने मुस्लिम चेहरा नजीब मुल्ला यांना तिकीट दिलं आहे. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघात आगरी-कोळी आणि मुस्लिम मतदारवर्ग मोठा आहे. आतापर्यंत हा वर्ग जितेंद्र आव्हाडांना साथ देत आला आहे. पण, महायुतीचे उमेदवार नजीब मुल्ला यांचाही जोरदार प्रचार सुरु आहे. मूळच्या कोकणातील असलेले नजीब मुल्ला यांच्याकडे भुमिपुत्रांसह मुस्लिम बांधवही वळताना दिसत आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील यंदाची लढत चुरशीची होणार आहे.
ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थी चळवळीत सहभाग होता. 2000 ते 2005 मध्ये ठाणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होते. 2002 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी मिळाली. यावेळी 2002 मध्ये नजीब मुल्ला पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. तेव्हापासून 2007, 2012, 2017 ते 2022 पर्यंत सलग चार वेळा जनतेने ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांना निवडून दिलं. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव, ठाणे महानगरपालिका विरोधी पक्षनेता, गटनेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ठाणे जिल्हाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषवलं. 2003 साली वयाच्या 28 व्या वर्षीच नजीब मुल्ला कोकण मर्कंटाईल बँकेचे संचालक म्हणून निवडून आले. 2003 पासून आतापर्यंत ते कोकण मर्कंटाईल बँकेचा संचालक म्हणून काम पाहत आहे.
मुंब्रा-कळवा मतदारसंघात एकीकडे नजीब मुल्ला आणि दुसरीकडे जितेंद्र आव्हाड असा जोरदार प्रचार सुरु आहे. दोन्हा पक्ष आणि उमेदवारांसह कार्यकर्त्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत असून जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे. आता मुंब्रा-कळवा मतदारसंघातील जनता कुणाला कौल देणार हे पाहावं लागणार आहे.