वेबसीरिज- उत्कंठावर्धक कथासूत्र
Marathi November 18, 2024 03:27 AM


>> तरंग वैद्य



वेगवेगळ्या काळातील गुह्यांच्या तपासावर आधारित ही वेबसीरिज. उत्कंठावर्धक असा प्रवास आणि शोधाचे कथासूत्र मांडणारी ही मालिका खिळवून ठेवते.

पंधरा वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीची, अदितीची हत्या झाली असून अजून ह्या प्रकरणाचा उलगडा झाला नाही. मुलीची आई आजही आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून जिकिरीने लढत आहे. दरम्यान न उलगडलेल्या प्रकरणांची संख्या खूप जास्त झाल्यामुळे शासनाने पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वर्ष होऊन गेलेल्या केसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय लोकांच्या पचनी पडत नाही आणि देशभरातून ह्या निर्णयाविरुद्ध लोक मोर्चे काढून विरोध दर्शवतात.

अदितीची हत्या राघव नौटियाल ह्या तरुणाने केली असून पंधरा वर्षांपूर्वी तपासादरम्यान तो सापडला नव्हता आणि तपास थांबला होता. युग जो आज पोलीस खात्यात इन्स्पेक्टर आहे. अदितीच्या अपहरणाच्या वेळेस ‘मौका ए वारदात’वर हजर होता (वय वर्षं 9-10) आणि त्याने अदितीला घेऊन जाणाऱयाला बघितले असून तो पुरुष नसून स्त्राr आहे हे त्याला माहीत होते, पण लहान समजून त्याचे कोणी ऐकले नव्हते. त्याने तपास अधिकारी अटवाल ह्यांना एका कागदावर लिहूनही दिले होते पण…

अदितीची आई आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून ह्या नवीन कायद्याच्या विरोधात प्रदर्शन करते, कारण अदिती प्रकरणाला पंधरा वर्षे पूर्ण होण्यास काहीच दिवस शिल्लक असतात. इथे रात्री अकरा वाजून अकरा मिनिटे झाली असता युगला एक वॉकी सापडतो, ज्यावर पंधरा वर्षांपूर्वीचा तपास अधिकारी अटवाल युगला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो आणि युग त्याप्रमाणे परत तपासाला सुरुवात करतो. तो आपल्या वरिष्ठांना समजावून तर कधी भांडून संपूर्ण प्रकरण हाताळतो. पंधरा वर्षे पूर्ण होण्यासाठी काही दिवसच शिल्लक असल्यामुळे तो आणि त्याची टीम दिवस रात्र काम करतात. कारण इथे त्यांची लढाई वेळेविरुद्ध (race against time) असते. युग ही लढाई जिंकतो आणि अदितीच्या आईला न्याय मिळवून देतो. दरम्यान सरकार जनहितार्थ आपला निर्णय मागे घेते. जुन्या थंड बस्त्यात धूळ खात पडलेली प्रकरणे (ज्यांना पोलिसी भाषेत ‘कोल्ड केस’ म्हटले जाते) पोलीस वरिष्ठ युगच्या टीमला सोपवतात आणि त्यांच्या टीमला ‘कोल्ड केस टीम’ असे नाव दिले जाते.

ह्या वेबसीरिजमध्ये अनेक कोल्ड केसेसचा छडा लावला जातो. रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांनी युग आणि अटवाल एकमेकांशी त्या बॅटरी नसलेल्या वॉकीद्वारे बोलून एकमेकांना मदत करतात हे या वेब सीरिजचे कथासूत्र आणि म्हणूनच याचे शीर्षक ‘ग्यारह-ग्यारह’ असे आहे.

कथा अर्थातच गुह्यांचा तपासावर आधारित आहे. वेगळेपण आहे ते 1990, 1196, 2016 ही वेगवेगळी वर्षे म्हणजे कथा वेगवेगळ्या काळातील आहे (डिफरन्ट टाइम झोन). ही कथा एका कोरियन वेब सीरिज ‘सिग्नल’वर आधारित असून सख्या आणि धर्मा ह्या निर्माण संस्थेने झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी ह्याची निर्मिती केली आहे. एकूण आठ भाग असून ही मालिका 9 ऑगस्ट 2024 ला प्रदर्शित झाली आहे. संपूर्ण कथा अर्थातच पोलीस खात्यावर आधारित आहे. कृतिका कामरा, राघव जुयाल, धैर्य करवा हे ते मुख्य पोलीस अधिकारी जे ‘कोल्ड केसेस’ना न्याय देतात. तिघेही आपापल्या भूमिकेत चपखल बसलेत. हर्ष छाया वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असून त्यांची भाषा काहीशी ‘अनदेखी’ ह्या वेब सीरिजसारखीच आहे. गौतमी कपूर अदितीच्या आईच्या छोटय़ा भूमिकेत आहे, पण प्रभावी आहे. मागच्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेले अभिनेते नितेश पांडे ह्या मालिकेत पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत आहेत. ब्रिजेंद्र काला, मुक्ती मोहन आणि इतर कलाकार पण आपली छाप सोडतात.

ह्या वेब सीरिजची कथा देहरादून, मसुरी परिसरात घडते. अदितीची कथा उलगडण्यासाठी कालमर्यादा असल्यामुळे ही कथा उत्कंठा वाढवणारी आहे. इतर कथा प्रकरणे सोडवतात इतकेच. जास्त चित्रीकरण रात्रीचे असल्यामुळे देहरादून, मसुरीचे सौंदर्य बघण्याची मजा अनुभवता येत नाही, पण ज्यांना तपास कथा आणि गुन्हे उलगडणाऱ्या कथांमध्ये रस आहे त्यांना ही काहीशी वेगळ्या धर्तीची मालिका नक्कीच आवडेल.

[email protected]

(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.