पुणे : जनभावनेचा आदर करीत मार्केट यार्डातील वाहनतळावरील प्रस्तावित फिश मार्केटच्या प्रस्तावाला सरकारकडून स्थगिती मिळविल्याचे समाधान वाटते अशा भावना पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केल्या.
शंकर महाराज वसाहत, चव्हाण नगर, पद्मावती नगर, तीन हत्ती चौक, विणकर सोसायटी परिसरात मिसाळ यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक राजेंद्र शिळीमकर , महेश वाबळे , विनय ठाकूर हरीश परदेशी रवींद्र चव्हाण कैलास मोरे बाप्पू भोसले श्रीकांत पुजारी, अनिल जाधव , सुशांत ढमढेरे, श्रुती नाझीरकर, अमोल पोद्दार , भरत गायकवाड, उद्धव कांबळे, प्रतीक कोंडे, संध्या नांदे, प्रशांत दिवेकर, योगेश वाबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिसाळ म्हणाल्या, दि पूना मर्चंट चेंबर, जैन समाज, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा फिश मार्केटला विरोध होता. त्यानुसार प्रस्तावाला स्थगिती मिळविली. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिले. व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर सकारात्मक बैठकीसाठी पुढाकार घेतला. या बैठकीत झालेल्या चर्चेमुळे राज्यभरातील व्यापारी संघटनांच्या संपाला स्थगिती देण्यात आली.
मिसाळ पुढे म्हणाल्या, पणनविषयक तांत्रिक आणि कायदेशीर सुधारणांसाठी समिती स्थापन करण्याचा या बैठकीत निर्णय करण्यात आला. जीएसटीच्या सर्व विषयांवर जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत चर्चेसाठी पाठपुरावा करण्यात आला. नगरविकास संदर्भातील विषयांसाठी बैठक घेण्यासाठी पुढाकार घेतला.
शिवनेरी रस्त्यावरील अतिक्रमण रोखण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्या केल्या. पदपथांवर बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. मार्केटयार्ड पीएमपी आगारात विविध नागरी सुविधा पुरविल्या, असेही त्या म्हणाल्या.