रुग्णालयांवरील ताण की उपकरणांच्या ऑडिटकडील दुर्लक्ष, आग लागण्याच्या घटनांमागची कारणं काय?
BBC Marathi November 18, 2024 02:45 AM
BBC झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज

उत्तर प्रदेशातील झाशी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शुक्रवारी (15 नोव्हेंबर) रात्री 10 च्या सुमारास आग लागून 10 बाळांचा मृत्यू झाला, तर 16 नवजात बालकं जखमी झाली.

देशात ‘’ (National Newborn Week 15 ते 21 नोव्हेंबर) सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे.

घटनेबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक सचिन माहोर म्हणाले, “शुक्रवारी रात्री साडे 10 ते पावणे 11 च्या सुमारास अतिदक्षता विभागात (एनआयसीयू वॉर्ड) शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. त्यावेळी तेथे 49 नवजात बाळांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.”

ज्या विभागात ही लाग लागली तिथं बहुतांश बालकं ऑक्सिजन सपोर्टवर होती. त्यामुळं जास्त ऑक्सिजन असल्याने आग वेगानं पसरली, असं माहोर म्हणाले.

मे 2024 मध्ये दिल्लीतील विवेक विहार येथील बेबी केअर रुग्णालयात अशाचप्रकारे अग्नितांडव घडून 7 बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेमागंही शॉर्टसर्किटचं कारण देण्यात आलं होतं.

रुग्णालयात आग लागून बालकांचा मृत्यू झाल्याच्या बऱ्याच घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. मात्र, अशाप्रकारच्या घटनांमागचं नेमकं कारण काय? रुग्णालयात आग का लागते, हा प्रश्न इथं प्रामुख्यानं उपस्थित होतो.

नवजात बालकांसाठीच्या अतिदक्षता विभागात आग लागण्याचा धोका किती गंभीर आहे? आणि अशाप्रकारचे अपघात टाळण्यासाठी काय खबरदारी घेता येईल, कोणत्या उपाययोजना करायला हव्यात? असे प्रश्नही उपस्थित होतात.

नियोनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट म्हणजे काय?

जन्मानंतर ज्या बालकांना अतिदक्षता घेण्याची गरज असते त्यांना उपचारार्थ रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (NICU) ठेवलं जातं.

दिल्ली येथील बत्रा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या बालरोग विभागाच्या प्रमुख मोनिषा गुप्ता यांच्या मते, अतिदक्षता विभागात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ट्रेंड हेल्थ प्रोफेशनल्स असतात, त्यांच्या विशेष देखरेखित नवजात बालकांवर उपचार केले जातात.

“बाळांच्या जन्माच्या एक महिन्यापर्यंत त्यांना एनआयसीयुमध्ये ठेवलं जातं. आजारी किंवा मुदतपूर्व जन्मलेल्या नवजात बालकांसाठी किंवा ज्या बाळांना श्वास घेण्यास त्रास होतो, वजन कमी असतं किंवा ऑपरेशनची गरज असलेल्या नवजात बालकांना या विभागात दाखल केलं जातं”, असं मोनिषा गुप्ता यांनी सांगितलं.

Getty Images नियोनेटल इंटेंसिव्ह केअर युनिट

मोनिषा गुप्ता पुढे म्हणाल्या की, “ज्याप्रकारे गंभीर आजारी वृद्धांसाठी इंटेन्सिव्ह केअर युनिट (ICU) असतं, तशाचप्रकारे नियोनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट (NICU) हे नवजात बाळांसाठी आहे.”

“नियोनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट हा रुग्णालयातील अतिशय संवेदनशील विभाग असतो, कारण इथल्या बहुतांश मशीन वीजेवर चालणाऱ्या असतात. येथे बाळासाठी आवश्यक असे वॉर्मर्स, व्हेंटिलेटर, फ्लुइड्स देण्यासाठीच्या पंपपासून तर मॉनिटर्सपर्यंतच्या सर्व गोष्टी वीजेवर अवलंबून असतात. यासह अतिरिक्त खबरदारी म्हणून मशीन्समध्ये बॅटरीची व्यवस्थाही असते, जेणेकरून वीज गेल्यास किंवा काही बिघाड झाल्यास बॅटरीच्या माध्यमातून उपकरणं सुरू राहतील.”

अशाप्रकारच्या विभागात पाईपद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. तसेच कुठेही गळती होऊ नये यासाठी वेळोवेळी तपासणीही करावी लागते. शॉर्ट सर्किटसारख्या परिस्थितीत ऑक्सिजनशी संपर्क आल्यास आग भडकू शकते, त्यामुळे विशेष खबरदारी घ्यावी लागते.

BBC

BBC रुग्णालयातील आगीमागचं कारण काय?

दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांच्यानुसार दिल्लीतील आगीच्या घटनांपैकी 99 टक्के प्रकरणं ही इलेक्ट्रिक फॉल्टमुळे होतात.

बीबीसीसोबत बोलताना गर्ग म्हणाले, “रुग्णालयातील आगीच्या घटनांचं विश्लेषण केल्यास यातील बहुतांश घटना या शॉर्ट सर्किट, ओव्हरलोडिंग आणि मशीन्स ओव्हर हिटिंगमुळे घडल्याचं दिसून येईल.”

“शॉर्ट सर्किट होण्यामागे विविध कारणं आहेत. वायरिंग जुनी असल्यास त्यातून वीजप्रवाह होताना वरील इन्सुलेशन वितळतं. तर अनेकदा सर्किटमधील चुकीमुळेही आग लागू शकते. एमसीबी नीट काम करत नसेल तर अशावेळीही शॉर्ट सर्किट होऊ शकतो”, असं गर्ग यांनी सांगितलं.

Getty Images मे 2014 साली दिल्लीच्या विवेक विहार येथील बेबी केअर रुग्णालयात आगीची घटना घडली होती, यात सात बाळांचा मृत्यू झाला होता.

गर्ग म्हणाले, “यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आपण वेळोवेळी वायरिंगची तपासणी करून घेतली पाहिजे. तसंच, आवारात बसवलेल्या इलेक्ट्रिक मीटरची सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. कारण बहुतेक घटनांमध्ये इलेक्ट्रिक मीटर पायऱ्यांखाली किंवा एखाद्या लहानशा ठिकाणी कोपऱ्यात दबलेली असतात, अशावेळी काळजी न घेतल्यास धोका उद्भवू शकतो. त्यामुळं मीटर आवारात डोळ्यांना दिसेल अशा ठिकाणी असेल तर आग लागण्याच्या घटनांवर 50 कमी होऊ शकतात असं मला वाटतं.”

पुढं सांगताना ते म्हणाले की, “रुग्णालयात लागलेली आग ही त्यातल्या त्यात सर्वात गंभीर मानली जाते. कारण या ठिकाणी अनेक गंभीर आजारी व्यक्ती असतात, कुठं कोणावर शस्त्रक्रिया सुरू असते तर कुठं एखादं मुलं इनक्युबेटरमध्ये असू शकतं. अशावेळी आगीची घटना घडल्यास प्रत्येकाला वेळेत बाहेर पडणं शक्य होत नाही आणि भीषण परिस्थिती उद्भवू शकते. अशा प्रकारच्या घटनांमध्ये, आम्हाला जास्तीचे अग्निशमन बंब पाठवावे लागेल. सामान्य घटनांच्या तुलनेत रुग्णालयातील घटनांमध्ये जास्त वाहनं पाठवावी लागतात.”

नियोजनात्मक सोयीसुविधांचा अभाव

(एनएनएफ) ही एक बिगर सरकारी संस्था असून गेल्या अनेक वर्षांपासून देशभरातील नवजात बालकांच्या बालकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी कार्यरत आहे.

नॅशनल निओनॅटोलॉजी फोरमने, युनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्यानं, एक तयार केलं आहे. त्यात रुग्णालयं किंवा नर्सिंग होममध्ये नवजात बाळांच्या देखभालीसाठीच्या मानकांची रूपरेषा आखून देण्यात आली आहे. एनएनएफ या निकषांच्या आधारे रुग्णालयातील एनआयसीयू आणि नर्सिंग होमना मान्यता देत असते.

Getty Images झाशी येथील महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेज

फोरमचे सरचिटणीस सुरेंद्रसिंग बिश्त म्हणतात की, देशभरात असे शेकडो नवजात अतिदक्षता विभाग आहेत, ज्यांना नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर (एनएबीएच) किंवा नॅशनल निओनॅटोलॉजी फोरम यांसारख्या एजन्सींकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे तेथे सुरक्षेची तपासणी होत नाही परिणामी ते अपघातांचे केंद्र बनतात.

“एनएनएफने देशभरातील 300 पेक्षा जास्त रुग्णालय आणि नर्सिंग होम्सना मुलांच्या उपचारांसाठी ठरवून दिलेल्या मानकांचे पालन करत असल्याचं प्रमाणपत्र दिलं आहे. त्यानुसार आम्हाला वेळोवेळी तिथं जाऊन पाहणी करावी लागते. यासाठी 25 ते 30 हजार रुपये खर्च येतो.”

यंत्रणेवरील दबाव

, जगभरात मरण पावणाऱ्या 100 नवजात बालकांपैकी 30 बालकं भारतातील असतात. तर, भारतात जन्मलेल्या 1000 बालकांपैकी 37 बालकं सुरुवातीच्या काही दिवसांतच दगावतात.

फोरमचे सरचिटणीस सुरेंद्र सिंह बिश्त म्हणतात की, दुर्गम भागात नवजात बालकांसाठी अतिदक्षता सुविधा नाहीत, अशा स्थितीत जिल्हा रुग्णालयांवरचा दबाव वाढतो आणि त्यामुळे अपघाताची शक्यताही नाकरता येत नाही.

अशाप्रकारच्या रुग्णालयांत, प्रौढांसाठी आयसीयूमध्ये 8 ते 10 खाटा असतात, परंतु लहान मुलांसाठीच्या अतिदक्षता विभागात परिस्थितीनुसार 50 खाटांपर्यंतची व्यवस्था करावी लागते.

कारण गावाकडील प्राथमिक केंद्रातून रेफर केलेल्या केसेससाठी सुविधा पुरवावी लागते. अशावेळी डॉक्टर लोकांना नकार देऊ शकत नाहीत आणि परिस्थितीनुसार खाटांची व्यवस्था करून त्यांना उपचार करावे लागतात.”

Getty Images इंटेन्सिव्ह केअर युनिट

बिश्त पुढे म्हणतात, “अशा परिस्थितीत उपकरणंही सतत सुरू असतात आणि क्षमतेपेक्षा जास्त वापर झाल्यानं ते गरम होऊन ठप्प पडू शकतात. या उपकरणांचीही वेळेवर तपासणी होतेच असं नाही, त्यामुळंही अपघाताची शक्यता वाढते.”

दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्गही हेच सांगतात. त्यांच्या मते, कोविड दरम्यान, गुजरात आणि महाराष्ट्रातील रुग्णालयांना आग लागल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

यामागचं कारण म्हणजे तेथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आणि उपकरणं इतका भार उचलू शकली नाहीत.

रुग्णालयातील आगीच्या मोठ्या घटना
  • दिल्ली, मे 2024 - विवेक विहार येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
  • मध्य प्रदेश, नोव्हेंबर 2021 - भोपाळच्या कमला नेहरू रुग्णालयाच्या बालरोग विभागात (Pediatric Unit) लागलेल्या आगीत चार मुलांचा मृत्यू झाला होता.
BBC
  • महाराष्ट्र, जानेवारी 2021 - भंडारा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
  • पश्चिम बंगाल, डिसेंबर 2021 - एका खासगी रुग्णालयाच्या एएमआरआय विभागात लागलेल्या भीषण आगीत जवळपास जणांचा मृत्यू झाला होता.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.