बाळापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यातील मारेकऱ्याला पैसे पुरवणाऱ्या एका आरोपीला अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा गावातून शनिवारी रात्री दिड वाजता अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सलमानभाई वोहरा असे असून त्याला २१ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी शिवकुमार उर्फ शिवा याला अटक करण्यात आल्या नंतर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने त्याला ही सुपारी दिली असल्याचे पोलिसांना त्याने सांगितले होते. या खून प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. खून करणाऱ्या आरोपींना सहकार्य करणारे आरोपी पोलिसांची अटक टाळण्यासाठी फरार झाले होते.
दरम्यान, आरोपींना सहकार्य करणारा आरोपी अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा गावात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मिळाली. या माहितीनंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक शनिवारी ता. १६ रोजी अकोला येथे पोहोचले आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांचे सहकारी व उरळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ ढोले यांच्या मदतीने लोहारा गावात अंत्यसंस्कारासाठी आलेल्या सलमानभाई वोहरा याला अटक केली. त्याची सासूच्या कागदपत्रांची पूर्तता करून गुन्हे शाखा पोलिस आरोपीसह मुंबईला रवाना झाले.
रात्री केली अटक
सलमानभाई वोहरा हा लोहारा येथे त्याच्या सासूच्या अंत्यसंस्कारासाठी शनिवारी रात्री आला होता. तो मुळचा गुजरात येथील असून त्याची सासूरवाडी बाळापूर तालुक्यातील लोहारा आहे. शनिवारी त्याच्या सासूचे निधन झाले. सासूच्या अंतिम दर्शनासाठी आरोपी सलमान वोहरा हा लोहारा येथे येणार असल्याची माहिती मुंबई पोलीसांना मीळाली होती. मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक शनिवारी अकोल्यात पोहोचले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके, उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या मदतीने लोहारा गाठत आरोपीला बेड्या ठोकल्या.
" आरोपीवर बाबा सिद्दिकी हत्याकांडातील मुख्य आरोपीला पैसे पुरवण्याचा आरोप असून तो घटनेच्या दिवसापासून फरार होता. सलमानभाई वोहरा असे या आरोपीचे नाव आहे. त्याला लोहारा येथून अटक करण्यात आली असून मुंबई पोलिस त्याला घेऊन रवाना झाले आहेत.
- शंकर शेळके पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला