Babar Azam Viral Video: पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तानने वनडे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला. मात्र टी२० मालिकेतील पहिले दोन्ही सामने पराभूत झाले आहेत, त्यामुळे मालिकाही गमवावी लागली आहे.
या दौऱ्यातही पाकिस्तान माजी कर्णधार बाबर आझमची बॅट फार कमाल दाखवू शकली नाही. टी२० मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात तो ३-३ धावाच करू शकला. यानंतर आता तो चाहत्यांकडून भर मैदानात ट्रोल झाला आहे.
टी२० मालिकेतील दुसरा सामना सिडनीमध्ये झाला होता. या सामन्यात पाकिस्तान संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला होता. यावेळी बाबर आझम बाऊंड्री लाईन जवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्याचदरम्यान काही प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवायला सुरुवात केली.
या घटनेचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये प्रेक्षक बाबर आझमला पाहून त्याचा अपमान करताना ऐकू येत आहेत.
प्रेक्षक म्हणत आहेत की 'लाज बाळग, तुला टी२० मध्ये संघात जागा नाही. परत पाकिस्तानला जा.' प्रेक्षकांकडून असा तोंडावर होत असलेला अपमान पाहून बाबर आझमला राग आल्याचे दिसून आले. त्याने रागात त्यांच्याकडे एक कटाक्षही टाकला.
त्यावरही प्रेक्षकांनी त्याचा अपमान केला. ते म्हणाले, 'राग आला का? परत रागात पाहा. आत्ताच एक कॅच सोडलास आणि दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवतोस.'
दरम्यान, बाबर आझमची कामिगिरी गेल्या काही महिन्यांपासून खास झालेली नाही. त्याला मायदेशात इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन कसोटीतूनही वगळले होते. त्यानंतर त्याचे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पुनरागमन झाले.
मात्र, त्याला त्याला ऑस्ट्रेलियातही फारशी बरी कामगिरी करता आली नाही. बाबर आझमची ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर होणार्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात निवड करण्यात आलेली नाही.
पाकिस्तानचा पराभवटी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात २९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुसरा सामना पाकिस्तानने १३ धावांनी गमावला. त्यामुळे पाकिस्तान या मालिकेत २-० अशा पिछाडीवर आहे.
आता पाकिस्तानला या मालिकेतील व्हाईटवॉश टाळायचा असेल, तर तिसऱ्या सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया देखील वनडे मालिकेतील पराभवाचा वचपा काढत तिसरा टी२० सामनाही जिंकत पाकिस्तानला व्हाईटवॉश देण्यासाठी उत्सुक असेल.