केडगाव : येथे ऊस तोडणी मजूराच्या तीन महिन्याच्या बालकावर बिबट्याने हल्या केल्याने बाळाचा मृत्यू झाला. एका मजूराने ऊसात बिबट्याचा पाठलाग करत बिबट्याच्या तोंडातून बाळाची सुटका केली. रूग्णालयात उपचार सुरू असताना बाळाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
विष्णुला मृत घोषित केल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी रूणालयाच्या बाहेर टाहो फोडला. दापोडीतील काका पिसे यांच्या गु-हाळावर मोरे दांपत्य ऊस तोडणीचे काम करत आहे. आज नेहमी प्रमाणे ते बोरीपार्धीतील बाळासाहेब टेंगले यांच्या ऊसात ऊस तोडणी करत होते. विष्णुला उसाच्या फडात झोळी करून झोपवले होते.
विष्णुला घेण्यासाठी त्याची आई झोळीकडे येत असताना आईसमोर बिबट्या विष्णुला उसात घेऊन गेला. विष्णुच्या आईने हंबरडा फोडल्यानंतर सर्व मजूर बिबट्याच्या मागे धावले. एका मजूराने धाडसाने बिबट्याच्या तोंडातून विष्णुची सुटका केली. विष्णुला तातडीने चौफुला येथील रूग्णालयात दाखल केले.
डॅा. प्रशांत शेंडगे म्हणाले, गळ्याची मुख्य धमणी तुटल्याने रक्तस्त्राव विष्णुच्या छातीत उतरला. त्याची कवटी फ्रॅक्चर झाली होती. विष्णुचा गळा, कान, डोके, पोट, चेह-यावर बिबट्याचे दात व नखांमुळे खोलवर जखमा झाल्या होत्या. विष्णुची गंभीर अवस्था पाहून तेथील परिचारिकांना अश्रू आवरता आले नाही. उपचार सुरू असताना विष्णुचे निधन झाले.
घटना घडल्यानंतर वन विभागाच्या अधिका-यांना ग्रामस्थांनी फोन केले. मात्र २५ किलोमीटरवरून घटनास्थळी यायला अधिका-यांनी तीन तास लावले. सरपंच बी.डी.सोडनवर तक्रार करताना म्हणाले, पिंजरा लावण्यासाठी वारंवार वन विभागाकडे संपर्क केला. दोन वेळा पत्रव्यवहार केला मात्र अधिका-यांनी नेहमी उडवाउडवीची उत्तरे दिली.
आता तातडीने पिंजरा लावावा. वन अधिकारी राहुल काळे यांनी घटनास्थळाला भेट दिली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बोरीपार्धी, दापोडी, वरवंड या भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. आता ऊस तोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे असे प्रकार वारंवार होणार असल्याने वनविभागाने सतर्क राहिले पाहिजे. अशी मागणी आहे
बिबट्यांच्या हल्लाबाबत जिल्हा प्रशासन सुस्त ....
एका महिन्यात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपुर्वी शिवतेज टेंभेकर ( वय ४ वर्ष ) याचा तर १८ ऑक्टोंबरला वंश सिंग ( वय सहा वर्ष, दोघे रा. मांडवगण ता. शिरूर ) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. वंश सिंग ऊस तोडणी मजूराचा मुलगा आहे. विष्णू करण मोरे ( वय तीन महिने रा. दापोडी ता.दौंड, मूळ गाव पाचोरा जि. जळगाव ) असे आज मृत्यूमुखी पडलेल्या बाळाचे नाव आहे. मांडवगण ते बोरीपार्धी या १५ ते २० किलोमीटरच्या परिसरात या तिन्ही घटना घडल्या आहेत. अगोदरच्या दोन घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन व वन विभागाने विशेष खबरदारी न घेतल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत.