N25781
प्रा. गाडेकरांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
शास्त्रीय संगीत मैफिलीः तळेखोल, आचऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १७ः शिरुर (पुणे) येथील प्रा. केशवराव गाडेकर यांच्या तळेखोल (दोडामार्ग) आणि आचरा येथील शास्त्रीय संगीताच्या मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध झाले. दोन्ही ठिकाणी मैफलींना रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
मालवणी बोली अभ्यासक प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी या मैफलींचे आयोजन केले होते. प्रा. गाडेकर शिरुर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाचे प्रमुख असून, ते ‘संगीत अलंकार’ परीक्षेत देशात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी त्यांच्या मैफली झाल्या आहेत. चंद्रकांत निगडे (पुणे) यांनी हार्मोनियमवर, तर अशोक मोरे यांनी तबल्यावर साथ केली.
तळेखोल येथे गायनाचार्य रामकृष्ण बुवा वझे स्मृती संगीत संस्थेच्यावतीने अध्यक्ष गंगाराम वझे यांच्या हस्ते प्रा. गाडेकर यांचा व सहकारी अशोक मोरे, चंद्रकांत निगडे यांचा सत्कार करण्यात आला. मनोज वझे व डॉ. लळीत यांनी सूत्रसंचालन केले. तळेखोल येथील गणपत गवस, उत्तम गवस व ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले.
तळेखोल येथील कार्यक्रमात राग अहिरी तोडीमध्ये ‘निस दिन तेरो ध्यान धरत हूँ’ ही विलंबित एकतालमधील आणि ‘हरी हरी नाम जप लो मनवा’ ही द्रुत तीनतालातील याप्रमाणे दोन बंदिशी प्रा. गाडेकर यांनी सादर केल्या. ‘घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद’ हे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील पद सादर केले. ‘आवडे देवाशी तो ऐका प्रकार’ ही एकनाथ महाराजांची रचना आणि ‘तुज विन कोणा शरण जाऊ नारायणा’ ही संत तुकाराम महाराजांची रचना हे दोन अभंग सादर केले. त्यानंतर श्रोत्यांनी केलेल्या आग्रहास्तव ''काटा रुते कुणाला'' आणि ''हे सुरांनो चंद्र व्हा'' ही दोन गीते सादर केली. शेवटी भैरवीमध्ये ''बैरन निंद कहासे आयी'' हे संत कबीर महाराजांचे पद सादर केले.
आचरा येथील श्री देव इनामदार रामेश्वर मंदिरातील मैफलीची सुरुवात राग यमनमध्ये ''सुमिरन करू मैं तोरा, तु साहेब मेरा'' ही विलंबित एकतालातील बंदिश आणि ''चंद्रमा ललाट पर सोहे भुजंग गर'' व ''दरशन दो शंकर महादेव'' या दोन बंदिशी अनुक्रमे झपताल आणि तीनतालात सादर केल्या. राग गावतीमध्ये ''डिम डिम डिम डमरू डिमक बाजे'' ही रूपक तालातील आणि ''साजन आए मोरे द्वार सखी री'' ही तीनतालमधील अशा दोन बंदिशी सादर केल्या. त्यानंतर ''जन्म वाया का दौडा रे, एका विठ्ठला शरण जा रे'' हे संत नामदेव महाराजांचे पद आणि ''ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा'' हे संत एकनाथ महाराजांचे पद सादर केले. ''घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद'' हे नाट्यपद सादर केले. शेवटी ''बैरन निंद कहासे आये'' हे संत कबीर महाराजांचे पद भैरवीमध्ये सादर केले.
''घुंगुरकाठी''चे सतीश लळीत, सुरेश ठाकूर, मंदार सांबारी उपस्थित होते.