सोलापूर : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यासहित सोलापुरातील बार्शीतही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आली आहे. या निवडणुकीमुळे राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. याचदरम्यान, सोलापूरच्या बार्शीत शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या बार्शीमध्ये शिंदे गटाच्या प्रचार रॅलीवर शनिवारी रात्री दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याचा शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आरोप केला आहे.
झालेल्या या दगडफेकीमध्ये रॅलीतील दोन महिला जखमी झाल्या आहेत. या रॅलीवर दगडफेक केल्याप्रकरणी कृष्णा राजपूत, प्रशांत जाधव, संपत जाधव, शिवाजी जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आरोपी शिवाजी जाधव आणि प्रशांत जाधव यांनी रॅलीवर विटा फेकून मारल्याचे तक्रारी नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी बीएनएस कलम 118 (1), 125 अ, 115 (2), 352, 351 (2-3), कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेत 1 आरोपी ताब्यात घेतले आहेत. इतर आरोपीचा शोध सुरु आहे.
'माझे विरोधक हे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे. ते स्वत: दहशत वाजवतात. २००४ साली माझ्यावर दुखील असाच हल्ला करण्यात आला होता, अशी प्रतिक्रिया आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, ऐन विधानसभा निवडणुकीत प्रचार रॅलीवर झाल्याने गोंधळ उडाला होता. या घटनेने प्रचाराला आलेल्या लोकांची धावाधाव झाली. तर काही महिला जखमी झाल्या. ऐन निवडणुकीत दगडफेकीची घटना घडल्याने बार्शीत आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.