Manipur : हिंसाचाराचा आगडोंब...मणिपूरमध्ये मंत्री, आमदारांची घरे पेटविली
esakal November 18, 2024 02:45 AM

इम्फाळ : मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून काही दिवसांपूर्वी संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या सहापैकी तीन नागरिकांचे मृतदेह येथील नदीत सापडल्यानंतर आज लोकांच्या संतापाचा अक्षरशः कडेलोट झाला. संतप्त आंदोलकांनी राज्यातील मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांना आगी लावल्या. सरकारी कार्यालये आणि वाहनांचीही जाळपोळ करण्यात आली.

या हिंसाचाराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन पाच जिल्ह्यांमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून काही संवेदनशील भागांतील इंटरनेटही बंद करण्यात आले आहे. आंदोलकांनी सहा आमदारांची घरे जाळली असून मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांच्या जावयच्या घरालाही आग लावण्यात आली. इम्फाळच्या अनेक भागांमध्ये हिंसाचाराचे लोण पसरले असून संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला.

हिंसाचाराचा आगडोंब

मध्यंतरी जिरीबाम जिल्ह्यातील सहा लोक संशयास्पदरीत्या बेपत्ता झाले होते. आसाम- मणिपूर सीमेवर असलेल्या जिरी आणि बराक या नद्यांमध्ये आज त्यांचे मृतदेह आढळून आल्यानंतर शनिवारी आंदोलनाचा वणवा पेटला. पूर्व आणि पश्चिम इम्फाळ, खोऱ्यातील विष्णूपूर, थौऊबाल, काकचिंग या भागांत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मध्यंतरी याच भागातील संवेदनशील स्थिती लक्षात घेऊन ‘अफ्स्पा’ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तो रद्द केला जावा अशी मागणी आता मणिपूर सरकारकडून केली जाऊ लागली आहे.

‘एनआयए’ला चौकशीचे निर्देश

नवी दिल्ली, हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये पुन्हा तणाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने राज्यात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच महत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सांगण्यात आले.

मणिपूरमध्ये मागील काही दिवसांत हिंसाचार वाढल्याचा दाखला देत गृह मंत्रालयाने सुरक्षा दलांना आज निर्देश जारी केले. मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांत हिंसाचार तीव्र झाला असून दोन्ही समुदायातील सशस्त्र गुन्हेगार पान २ वर

‘एनआयए’ला चौकशीचे निर्देश

हिंसाचारात सहभागी आहेत. यामुळे जीवितहानी झाली असून कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. त्यापार्श्वभूमीवर हिंसक आणि विघटनकारी कारवायांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

यासोबतच, संवेदनशील प्रकरणांचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्यात येत असल्याचेही गृहमंत्रालयाने स्पष्ट केले असून सामान्य जनतेला शांतता राखण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सुरक्षा दलांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मणिपूर हिंसाचारावरून कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान परदेश दौऱ्यावर निघाले असून ते अद्याप मणिपूरला गेले नसल्याची तोफ काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी डागली.

सोशल मीडियावरून पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडताना जयराम रमेश यांनी म्हटले आहे की पुढील तीन दिवस देशाला अजैविक पंतप्रधानांचा अपप्रचार सहन करावा लागणार नाही कारण ते परदेश दौऱ्यावर जात आहे. मात्र मे २००३ पासून मणिपूरची जनता दुःखात असून या अशांत राज्याला भेट देण्याचे पंतप्रधान मोदी टाळत आहेत, त्यांचा हा नकार अनाकलनीय आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.