Women’s Asian Champions Trophy 2024: गतविजेत्या भारतीय महिला हॉकी संघाची आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडकातील दमदार कामगिरी रविवारीही कायम राहिली. भारतीय महिला संघाने जपानवर ३-० असा विजय मिळवला.
यजमान भारतीय महिला संघाने साखळी फेरीत पाचही लढतींमध्ये विजयावर मोहोर उमटवत १५ गुणांसह पहिले स्थान कायम राखले. चीनच्या संघाने १२ गुणांसह दुसरे, मलेशियाने सहा गुणांसह तिसरे आणि जपानने पाच गुणांसह चौथे स्थान पटकावले. भारतासमोर उपांत्य फेरीच्या लढतीत जपानचे, तर चीनसमोर मलेशियाचे आव्हान असणार आहे.
जपानविरुद्धच्या लढतीत भारतीय महिला संघाने संथ सुरुवात केली; मात्र लढतीत वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पहिली क्वार्टर संपायला सहा महिने बाकी असताना भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र यावर गोल करता आला नाही.
यानंतरही मनीषा व नेहा यांच्याकडून गोल करण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र त्यांनाही यश मिळाले नाही. अखेर पहिल्या क्वार्टरमध्ये गोलशून्य बरोबरी राहिली.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये जपानच्या हॉकीपटूंनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. दुसरी क्वार्टर संपायला पाच मिनिटे बाकी असताना भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; मात्र त्यावर गोल काही झाला नाही. जपानचे आक्रमणही भारतीय हॉकीपटूंनी लीलया थोपवून लावले. त्यामुळे पूर्वार्धातही गोलशून्य बरोबरी कायम राहिली.
भारतीय महिला हॉकीपटूंनी तिसऱ्या क्वार्टरमध्ये आपला आक्रमक खेळ कायम ठेवला. सलीमा टेटे, दीपिका यांनी मिळून सुरुवातीलाच गोल करण्याचा प्रयत्न केला; पण जपानच्या बचावपटूंकडून हे आव्हान पेलवण्यात आले.
३७व्या मिनिटाला मात्र नवनीत कौर हिने जपानचा बचाव भेदला. तिने सर्कलच्या येथून चेंडूवर पकड मिळवत रिव्हर्स फटक्याद्वारे भारताचा पहिला गोल केला. तिसरी क्वार्टर संपल्यानंतर भारताकडे १-० अशी आघाडी होती.
दीपिकाचा सुपर शोभारतीय महिला हॉकीपटूंनी चौथी क्वार्टर गाजवली. दीपिकाने ४७व्या व ४८व्या मिनिटांना भारतीय संघासाठी गोल केले. दीपिकाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना आपले अद्भुत कौशल्य दाखवले. भारतीय महिला संघ ३-० असा पुढे गेला. त्यानंतर यजमान संघाने मागे वळून बघितले नाही. जपानचा संघ बॅकफूटवर फेकला गेला.
उपांत्य फेरीच्या लढतीचीन विरुद्ध मलेशिया
भारत विरुद्ध जपान
(दोन्ही लढती १९ नोव्हेंबरला होतील.)