दारू पिण्याची इच्छा झाली, तर भाजपवाल्यांनी पाठवलेली दारू प्या, मात्र मत काँग्रेसलाच द्या! काँग्रेसच्या बंटी शेळकेंचा वादग्रस्त सल्ला
रजत वशिष्ठ, एबीपी माझा November 18, 2024 01:43 PM

नागपूर : जर तुमची दारू पिण्याची इच्छा झाली, तर भाजपवाल्यांनी तुमच्या घरी पाठवलेली दारू घ्या, मात्र मत काँग्रेसला (Congress) द्या. जर तुम्हाला त्यांच्याकडून भ्रष्टाचाराचा पैसा घेण्याची इच्छा झाली, तर तुम्ही तो ही घ्या, मात्र मत काँग्रेसला द्या. नागपुरात शेकडो मतदारांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवाराने असा वादग्रस्त सल्ला दिला आहे. मध्य नागपुर मधील काँग्रेस उमेदवार बंटी शेळके (Bunty Shelke) यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात (Central Nagpur Assembly Constituency) रविवारच्या संध्याकाळी बंटी शेळके यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी रोड शो केलेत. त्या रोड शोच्या पूर्वी बंटी शेळके यांनी रोडशो साठी आलेल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदारांसमोर भाषण केले. बंटी शेळके यांच्या या भाषणाच्या वेळेला प्रियंका गांधी रोड शोच्या ठिकाणी पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे  त्यांच्या येण्यापूर्वी हे भाषण झाले. त्यावेळी बोलताना बंटी शेळके म्हणाले की, भाजपवाले भ्रष्टाचाराचे पैशातून ही निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यामुळे ते तुमच्या घरी आमिष म्हणून दारू घेऊन आले आणि तुमची ती पिण्याची इच्छा झाली, तर ती दारू तुम्ही घेऊन घ्या. जर भाजपवाले त्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा घेऊन तुमच्या घरी आले, तर तुम्ही तेही घेऊन घ्या. मात्र मत काँग्रेसला द्या, असे बंटी शेळके म्हणाले. माझ्याकडे लोकांना वाटण्यासाठी पैसा नाही. मी दुचाकी वर चालणारा नेता आहे आणि भविष्यातही दुचाकीवालाच राहील, असं ही बंटी शेळके या भाषणात म्हणाले.

शब्दश काय म्हणाले काँग्रेस उमेदवार बंटी शेळके 

मी दारू पीत नाही, दारू पिणे चुकीचे आहे, त्याने लिव्हर खराब होतो.  मात्र भाजप वाले पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. पाचशे कोटींची निवडणूक ते लढवत आहेत. ते मतदारांना सोन्याचे दागिने देत आहेत. भाजपवाले तुमच्या घरी दारू देण्यासाठी आले आणि जर तुमची दारू प्यायची इच्छा झाली, तर तुम्ही ती दारू घ्या. मात्र, त्यानंतर ही मत काँग्रेसला द्या. मी तर पैसा वाटू शकत नाही. मात्र त्यांच्याकडे भ्रष्ट मार्गाचा खूप पैसा आहे. मात्र जर तुमची इच्छा त्यांच्याकडून तो पैसा घेण्याची झाली. तर ते ही घेऊन घ्या. मात्र मत काँग्रेसला द्या. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई आहे. आमच्याकडे पैसा  नाही. माझा घर आजही कच्च आहे. माझ्याकडे दुचाकी आहे. नगरसेवक असूनही माझ्याकडे दुचाकीच राहिली आहे. मी आज ही दुचाकी वर आहे आणि उद्याही दुचाकी वरच राहणार. असं ही बंटी शेळके या भाषणात म्हणाले. 

हे ही वाचा 

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.